उदयनराजेंची पृथ्वीराज चव्हाणांवर अप्रत्यक्ष टीका

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा काल  साताऱ्यात आली. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीसोबतच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर  टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले भाजपात सामील झाले  आहेत.

पृथ्वीराज चव्हाणांवर अप्रत्यक्ष टीका करताना उदयनराजे म्हणाले की , ‘साताऱ्यात आयआयटी, आयआयएमसारख्या संस्था आणायच्या होत्या. पुण्याप्रमाणे साताऱ्यालादेखील शिक्षणाचं माहेरघर करण्याचं स्वप्न होतं. पण तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी मला जिल्ह्यात जागा नसल्याचं कारण दिलं. त्यानंतर मी प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटलो. जिल्ह्यात कुठे कुठे सरकारी जागा आहेत त्याचा शोध घेतला. त्यानंतर जागांची यादी मुख्यमंत्र्यांना दिली.

नऊ वेळा त्यांची भेट घेतली. पण काहीच झालं नाही. त्या कामासाठी मुख्यमंत्री  स्वाक्षरी करत नव्हते. मला वाटलं मुख्यमंत्र्यांच्या पेनातली शाई संपली असावी. त्यामुळे ते स्वाक्षरी करत नसावेत. त्यामुळे मी एक चांगलं पेन घेतलं आणि त्यांच्या भेटीला गेलो. तुमच्या पेनातली शाई संपली असावी म्हणून कदाचित स्वाक्षरी करत नसाल. म्हणून हे नवीन पेन आणलं असं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्यावर त्याची काही गरज नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पेन खिशात टाकलं. पण स्वाक्षरी काही केली नाही. ‘

साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण –

उदयनराजे भोसले यांनी अमित शाह यांच्या उपस्थित दिल्लीमध्ये शनिवारी भाजपात प्रवेश केला. उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडल्यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. पण, उदयनराजे भोसले यांचे वर्चस्व  असलेल्या या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची हा यक्षप्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आहे.

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात आघाडीकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. यासाठी काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांची मनधरणी सुरु झाल्याचंही वृत्त आहे.