होय, सत्तेसाठीच तडजोड ! उद्धव ठाकरेंचे सडेतोड उत्तर, मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर ’50-50′ म्हणजे काय असते ते समजेल ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात शिवसेनेने महाराष्ट्राच्या हितासाठी आणि सत्तेसाठी तडजोड केली असून मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर फिफ्टी फिफ्टी म्हणजे नेमके काय असते हे समजेल, असे शिवसेनेवर होत असलेल्या टिकेला उत्तर दिले. सामना या दैनिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे उत्तर दिले. कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपामधील वाटाघाडीवर सविस्तरपणे भाष्य केले.

१२४ ही जागा कमी वाटते १६४ ठिकाणी शिवसेना नाही, असे विचारता ठाकरे म्हणाले की, १२४ ही संख्या कमी वाटत असली आणि १६४ जागी शिवसेना नाही. आता असं आहे की, १६४ ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते तयार आहेत. तसे १२४ ठिकाणी भाजपाचेही आहेत. म्हणून युतीत काही कमवताना काही गमवावं लागतं. पण शेवटी एकत्रित निकाल बघितल्यानंतर आपण कुठे आहोत, हे कळतं. मी म्हटले ना, सत्ता आपल्याला हवी आहेच, होय मी सत्तेसाठीच युती केली. त्यात लपवण्यासारखे काही नाहीय. परंतु ही सत्ता असेल तर त्या १६४ मतदारसंघांतल्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी काही ना काही देऊ शकतो. म्हणून युती केली.

ठाकरे म्हणाले, मी महाराष्ट्राच्या हिताचा शब्द दिल्यानंतर तुझं माझं करुन खेचाखेची करणे मला पटत नाही. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी जागा वाटपाच्या वेळी आमची अडचण समजून घ्या, अशी विनंती केली होती. मी ती अडचणी समजून घेतली. एकाकी लढायचेच झाले तर शिवसेना ते कधीही करु शकते.

आतापर्यंतच्या जागावाटपाच्या इतिहासात शिवसेनेला सर्वाधिक कमी जागा मिळाल्या आहेत. असे विचारता उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, हा आकडा कमी असला तरी यंदा शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून येतील. वादळ असताना शांत राहायचे असते, असे बाळासाहेबांनी मला शिकवले आहे. त्यामुळे सध्याच्या वादळात इतर पक्ष उखडून फेकले जात असताना मी शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रुजवेन. २४ तारखेला निकाल लागल्यानंतर सत्ता वाटपात जबाबदारी आणि अधिकार यांचे समसमान वाटप होईल.

Visit : Policenama.com