‘महाविकास’चं सरकार गेल्या 5 वर्षातील विकास कामांची ‘श्वेतपत्रिका’ काढणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गेल्या 5 वर्षात झालेल्या विकास कामांची माहिती मागविण्यास सुरवात केली आहे. गेल्या 5 वर्षात विकास कामांवर किती खर्च झाला, किती कामे अद्यापही शिल्लक आहेत, कामे कुठे होत आहेत. कामे का अडली आहेत, कामांमध्ये किती प्रगती झाली आहे. तात्काळ करावयाची कामे कोणती अन् कमी महत्वाची कामे कोणती याचा लेखाजोखा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मागविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या विकास कामांची श्वेतपत्रिका काढणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विधानसभेच्या सभागृहात आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. त्यानंतर विरोधी पक्ष नेते म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्याला आर्थिक निधी मिळविण्यासाठी ते लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला जाणार आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. मात्र तो तात्पुरता असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी गेल्या 5 वर्षाच्या काळात झालेल्या विकास कामांची तपशीलवार माहिती मागवली आहे. त्यामुळे महाविकासचं सरकार फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या विकास कामांची श्वेतपत्रिका काढणार काय अशी चर्चा होत आहे.

Visit : Policenama.com