…तर आमच्या पक्षाकडून निवडणूक लढवा, उदयनराजेंना या पक्षाची ‘OFFER’ 

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सकल  मराठा समाजाच्या वतीने समाजाच्या “महाराष्ट्र क्रांती” या नव्या पक्षाची स्थापना  दिवाळीतील पाडव्याच्या मुहूर्तावर कार्यकर्ते सुरेश पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आली. मराठा समाजाच्या विकासासाठी आता ”महाराष्ट्र क्रांती” सेना पक्षाच्या वतीने लोकसभा विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा आज कोल्हापुरात करण्यात आली.

विशेष म्हणजे खासदार  उदयनराजे यांनी जर राष्ट्रवादी पक्षातून निवडणूक लढवली नाही तर त्यांनी महाराष्ट्र क्रांती सेनेकडून निवडणूक लढवावी असे खुले आमंत्रण देखील महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा समाजाचे  दैवत आहेत आणि त्यांचे थेट वंशज म्हणजे साताऱ्याचे खासदार उदयन राजे आहेत त्यामुळे त्यांनी जर राष्ट्रवादी पक्षातून निवडणूक लढवली नाही तर त्यांनी महाराष्ट्र क्रांती सेनेकडून निवडणूक लढवावी अशी इच्छा यावेळी व्यक्त केली.

दरम्यान , मराठा समाजाचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा दोन महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. त्यानुसार पाडव्याच्या मुहूर्तावर मराठा समाजाने काहींचा विरोध डावलत अखेर आज महाराष्ट्र क्रांती सेना या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाशी फारकत घेऊन पाटील यांनी पक्षाची स्थापना केली आहे. मराठा मोर्चाने अशा प्रकारे मराठा समाजाचा वापर करून पक्ष न काढण्याचा इशारा दिला होता. तरीही पाटील यांनी न जुमानता पक्षाची घोषणा केली आहे. लोकसभेच्या ५ आणि विधानसभेच्या ५० जागा लढवणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले आहे. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली १३ संघटना यांचा नव्या राजकीय पक्षाला पाठिंबा असल्याचा दावा  “महाराष्ट्र क्रांती” च्या वतीने करण्यात आला.