केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘टोसिलीझीमॅब’ बाबतचा संभ्रम दूर करावा : मोहन जोशी

पुणे – कोरोना रुग्णांना ‘टोसिलीझीमॅब’ इंजेक्शन (Tocilizumab) देण्याबाबत वैद्यकीय क्षेत्रात असलेला संभ्रम दूर करावा अशा मागणीचे निवेदन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे अशावेळी वैद्यकीय क्षेत्रात उपचारांबाबत संभ्रम राहू नयेत. टोसिलीझीमॅब इंजेक्शनचा वापर कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांसाठी केला जातो. रुग्ण गंभीर अवस्थेत असताना हा उपचार केला जातो परंतु त्याच्या प्रभावी परिणामांबाबत वैद्यकीय क्षेत्रात दुमत आहे. काही डॉक्टर्स, रुग्णालये या इंजेक्शनचा वापर करतात किंवा काही या इंजेक्शनच्या परिणामांबाबत शंका घेऊन त्या त्याच्या वापराला नकार देतात. अशी मनभिन्नता साथीच्या काळात योग्य ठरत नाही. सध्या साथीचा जोर असताना त्याबाबत डॉक्टरांमध्येच संभ्रम असणे अधिकच गोंधळवून टाकणारे आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य म़ंत्रालयाने आणि आयसीएमआर या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने मार्गदर्शन तत्त्वांद्वारे याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत असे मोहन जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.

काही रुग्णालये किवा डॉक्टरांकडून टोसिलीझीमॅब इंजेक्शन सुचविले जाते. पण, ते इंजेक्शन सहजासहजी उपलब्ध होत नाही. रुग्णालयांकडे त्याचा साठा नसतो. ही इंजेक्शन्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी असेही मोहन जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.