ब्रिटिश PM जॉनसन यांनी दुसऱ्या पत्नीला दिला घटस्फोट, गर्लफ्रेन्ड कॅरीशी लग्न करण्याचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी आपली दुसरी पत्नी मरिना व्हीलरशी घटस्फोट घेतला आहे. मरीनाची आई भारतीय वंशाची होती. या घटस्फोटानंतर ५५ वर्षीय जॉनसनचा  गर्लफ्रेन्ड कॅरी सायमंड्सशी लग्न करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडनमध्ये २९ एप्रिलला सायमंड्सने एका मुलाला जन्म दिला होता. सायमंड्सकडून जॉनसनचे हे पहिले मुल आहे. स्थानिक माध्यमांनुसार, घटस्फोटाबाबत दोन्ही पक्षांत ४ लाख पौंड (सुमारे ३७ कोटी रुपये) वर सहमती दर्शवली असल्याचा अंदाज आहे.

जॉनसन आणि मरिना घटस्फोटाच्या रकमेसाठी गेल्या फेब्रुवारीमध्ये लंडनच्या सेंट्रल फॅमिली कोर्टात दाखल झाले होते. जॉनसन आणि मरीना यांचे १९९३ साली लग्न झाले होते. २०१८ मध्ये दोघे वेगळे झाले होते. त्यांना चार मुले आहेत. मरिनापासून वेगळे झाल्यानंतर जॉनसनने सायमंड्सबरोबरच्या आपल्या संबंधांची पुष्टी केली होती. जॉनसनचे पहिले लग्न १९८७ मध्ये अ‍ॅलेग्राशी झाले होते. विद्यापीठात शिकत असताना दोघांची भेट झाली होती.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की बोरिस जॉनसन आणि त्याची  गर्लफ्रेन्ड कॅरी सायमंड्सने त्यांचे आजोबा आणि डॉक्टरांच्या नावाने त्यांच्या नवजात मुलाचे नाव विल्फ्रेड लॉरी निकोलस ठेवले होते. सांगितले जात आहे की, ब्रिटीश पंतप्रधानांना कोरोनाची लागण झाली होती, तेव्हा या दोन डॉक्टरांनी उपचार करून त्यांचे प्राण वाचवले होते. सोशल मीडियावर याची घोषणा करत ३२ वर्षीय सायमंड्स म्हणाली की, बाळाचे नाव त्याचे आजोबा लॉरी, जॉनसनचे आजोबा विल्फ्रेड आणि जॉनसनचे उपचार करणारे डॉक्टर निक प्राइस व निक हार्ट (निकोलस) यांच्या नावाने ठेवले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर पुन्हा कामावर परतले आहेत. नुकतेच त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. सायमंड्समध्ये देखील कोरोनाची लक्षणे होती, परंतु ती त्यातून बरी झाली आहे. जॉनसन आणि कॅरी सायमंड्स यांचा मुलगा विल्फ्रेड लॉरी निकोलसचा जन्म लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज हॉस्पिटलमध्ये झाला होता.