मुख्यमंत्र्यांसह किमान ४० हजार सातारकरांना मारण्याची धमकी

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या जीवे मारण्यासंबंधीची पोस्ट एकाने फेसबुकवर टाकली आहे. या पोस्टमध्ये खंडाळा येथे मुख्यमंत्र्यांसह किमान ४० हजार सातारकरांचा जीव घेणार असल्याचा उल्लेख करण्यात आला असून सदर प्रकारामुळे साताऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्र्यांसह असंख्य लोकांना मारले जाणार असल्याचा मॅसेज व्हायरल होवू लागल्याने पोलिस हडबडून गेले असून, गुप्तचर यंत्रणाही तपासाला लागली आहे.‘अजितदादा बच गया, अब सातारा मे सीएम मरेगा,’ अशा मेसेजने सातारा पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे.

काय आहे फेसबुक पोस्ट –

‘आय एम अजमल कसाब. कल अजितदादा बच गया. अब सातारा मे सीएम मरेगा. २६/११ आतंकवादी हमला वैसे अब ऑपरेशन सातारा सीएम और ४०,००० लोग खलास. ४ फेब्रुवारी २०१९ खंडाला, सातारा इलेक्शन दौरा, ’असा पोस्टमधील मजकुराचा आशय आहे. याशिवाय आणखी एक अशाच पध्दतीची मोठी पोस्ट फेसबुकवर संबंधिताच्या अकाउंटवर पडलेली आहे.

रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फेसबुकवरील एकाच्या अकाउंटवर ही पोस्ट पडली आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन पोस्ट टाकण्यात आल्‍या असून त्यासह एका पक्षाच्या कार्यक्रमाचे फोटोही टाकण्यात आले आहेत. या दोन्ही पोस्टमध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे होणार्‍या कार्यक्रमासंबंधी टिप्पणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांसह किमान ४० हजार सातारकरांचा खात्मा करणार असल्याचाही उल्लेख आहे.सदर फेसबुक पोस्टमुळे मॅसेज टाकणारा तो व्यक्ती कोण आहे ? मॅसेज टाकण्यामागे हेतू काय आहे ? फेसबुक अकांउट हॅक झाले आहे का ? फेसबुक अकाउंट खरे आहे का? पोलिस या घटनेचा कधी व कसा तपास करणार? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान यापूर्वीही मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. जून महिन्यात मुख्यमंत्र्यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसंच मंत्रालयात एक निनावी पत्रही आलं होतं त्यात मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांना धोका असल्याचं म्हटलं होतं.