Unlock 2.0 : मोदी सरकारची घोषणा ! 31 जुलैपर्यंत Metro, जिमसह शाळा-कॉलेज राहणार बंदच, जाणून घ्या नियमावली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसवर नियंत्रण अजूनही मिळवता आले नसल्याने अजूनही सार्वजनिक जीवनावर निर्बंध कायम असती, असं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मधून याची कल्पना दिली होती. आता केंद्राने औपचारिक घोषणा करत कुठल्या गोष्टींवर निर्बंध असतील हे स्पष्ट केलं आहे. अनलॉकच्या पहिल्या टप्प्याप्रमाणे मेट्रो, जिम यासह शाळा, कॉलेज बंद राहणार आहेत, असं गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

1 जुलै ते 31 जुलै या काळात नाईट कर्फ्यू असणार आहे. म्हणजे रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी असेल. महाराष्ट्रात अनलॉक 2.0 ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारीच केली. पण म्हणजे नेमके कुठले व्यवहार खुले होणार आणि कुठले निर्बंध कायम राहणार याविषयी स्पष्टता आणणारा केंद्राचा आदेशही आता निघाला आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा वाढता धोका आहे त्या ठिकाणी लॉकडाऊन लागू होणार आहे. 31 जुलैपर्यंत हे निर्बंध कायम असतील असे स्पष्ट झालं आहे.

कोरोनाचा धोका कायम असल्याने देशभर लॉकडाऊन 31 जुलै पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 जुलैपर्य़ंत टप्प्याटप्प्याने शिथिलता दिली जाणार आहे. मिशन बिगेन अगेन अंतर्गत दिलेल्या शिथिलताही सुरु राहतील. दरम्यान, अनलॉक 2.0 मध्ये शाळा, कॉलेज, शॉपिंग मॉल, थिएटर, नाट्यगृह, जिम, सार्वजनिक वाहतूक, मेट्रो, आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंदच राहणार आहेत.