रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले – ‘…तोवर तुटवडा कमी होणार नाही’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत कोरोना प्रतिबंधक लस, रेमडेसिविर, ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. मात्र, केंद्र सरकार जोपर्यंत आयात सुरु करत नाही, तोवर लस आणि रेमडेसिविरचा तुटवडा कमी होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्ट केले आहे. दरम्यान मी माझ्या नेत्याचा सल्ला मानेन, महाविकास आघाडीचा सल्ला मानेन, बाकी कुणी काय सल्ला द्यायचा तो देऊ द्या. तो एका कानाने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा, असा जोरदार टोला अजितदादांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना लगावला आहे

कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आयोजित केलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, राज्यासाठीचा रेमडिसिविरचा कोटा कमी केला आहे. तसेच जामनगरमधील ऑक्सिजनचा जो 250 मेट्रिक टनचा कोटा होता तो देखील कमी केला आहे. याबाबत आम्ही केंद्रांशी बोलत आहोत. तसेच विविध ठिकाणी बंद पडलेले ऑक्सिजन प्लांट सुरू केले आहेत. राज्यातील साखर कारखान्यांना देखील ऑक्सिजन निर्मितीबाबतच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नवीन कोविड सेंटर उघडायचे असेल तर आरोग्य विभागाशी बोलूनच परवानगी दिली जाणार असल्याचे पवार म्हणाले.