‘UPA ला शरद पवारांचा फायदा होईल, पण भाजपला काही एक फरक पडणार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आणि देश पातळीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामागचे कारण म्हणजे गुरुवारी दिल्लीत शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करण्याची चर्चा रंगली होती. लवकरच शरद पवार युपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील, असा दावा करण्यात येत आहे. त्यातच आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांच्या अध्यक्षपदाचा युपीएला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) अध्यक्ष शरद पवार झाले तरी भाजपला त्या निवडीचा काहीही फरक पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप मजबूत आहे, मोदींचे नेतृत्व सक्षम आहे. परंतु, शरद पवार यांच्या नेतृत्वाचा युपीएला नक्कीच फायदा होईल.”

“पवार यांचा अनुभव मोठा असून, त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांबरोबर संबंध मैत्रीपूर्ण आहेत. त्यांच्या सोशल इंजिनिअरींगचा फायदा यूपीएला ते करुन देतील. मात्र, आम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. कारण, भाजपाला काहीही फरक पडणार नाही,” असेही मुंडे यांनी सांगितलं.

राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस कमकुवत

शरद वार युपीएचे अध्यक्ष होतील अशा चर्चा दोन दिवसांपासून सुरु आहेत. त्यावरती वार्ताहरांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, शरद पवार यांनी या बातमीत तथ्य नसल्याचे सांगितलं आहे. मात्र, जर अधिकृतरित्या याबाबत प्रस्ताव आला तर आमचा त्यांना पूर्णपणे पाठींबा असेल. सध्या राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस कमकुवत आहे, त्यामुळे विरोधी पक्षांनी एकत्र येऊन युपीएला ताकद देण्याची गरज असल्याचे, त्यांनी म्हटलं.

सोनिया गांधी युपीएच्या अध्यक्षा

दरम्यान, सध्या सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे आणि युपीएचे नेतृत्व आहे. मात्र, देशात राजकीय पर्याय उभा करण्यासाठी गांधी कुटूंब एक पाऊल मागे घेण्याची चर्चा होती. केंद्रात विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार यांना मोठा अनुभव असून, देशातील विविध राज्यांत भाजपची वाढलेली ताकद आणि युपीएची आक्रमकता विचारात घेऊन हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, शरद पवार यांनी बातमीत तथ्य नसल्याने सांगत सर्व दावे फेटाळून लावले आहेत.