ऊर्मिला मातोंडकर यांच्या नावाची तरी घोषणा तत्काळ करा : काँग्रेस

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नेमणूक अजून झालेली नाही. उच्च न्यायालयात एकनाथ खडसे, राजू शेट्टी, उर्मिला मातोंडकर, यशपाल भिंगे, रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुजफ्फर हुसेन, अनिरुद्ध वनकर आणि चंद्रकांत सूर्यवंशी या नावाच्या शिफारशीला उच्च न्यायालयात आवाहन देण्यात आलं आहे. या आठही जणांना याचिकेत प्रतिवादी करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांना दिली. तसंच याचिकेवरील पुढील सुनावणी दिनांक २४ रोजी आहे.

ऊर्मिला मातोंडकर यांचे नाव शिवसेनेचे यादीत गेले किंवा कुठल्याही पक्षाच्या यादीत गेले असले तरी त्यामुळे त्यांनी केलेली चित्रपटसृष्टीचे सेवा संपली असं म्हणायचं का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. दरम्यान, लवकरात लवकर सदर बाबींचा निकाल लावून बारा आमदार यांची नियुक्ती घोषित करावी किंवा उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची घोषणा तरी त्वरित करावी अशी विनंती मुंबई काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी केली आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा मिळावा या हेतूने विधान परिषद या वरिष्ठ सभागृहात राज्यपाल नामनियुक्त आमदार नेमण्याची तरतूद आहे. घटनेतील तरतूदीनुसार सामाजिक सेवा, विज्ञान, कला, साहित्य, सहकार चळवळ या क्षेत्रातील विशेष ज्ञान व अनुभव असलेल्या व्यक्तींची निवड करण्यात येते. मात्र, या तरतुदीला फाटा देत राजकीय पार्श्वभूमी असलेल्या यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्र्यांनी केली असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. मुंबई काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी मात्र, हे म्हणणे फेटाळून लावले आहे. हे म्हणणे आधारहीन असल्याचं देखील ते म्हणाले.

साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, समाजकारण आणि राजकारण हे एकमेकांत मिसळून काम करत असतात. समाजकारण करता करता व्यक्ती राजकीय बैठकीत समाविष्ट होऊन समस्यांचे निराकरण करण्यासाठी काम करू शकते. त्यामुळे उर्मिला मातोंडकर, राजू शेट्टी, एकनाथ खडसे, सचिन सावंत यांनी आयुष्यभर कमावलेले साहित्य, कला, समाज सेवा, सहकारी सेवा एका मिनिटात संपून त्यांच्यावर राजकीय शिक्का मारणं हा त्यांच्या कार्याचा अपमान आहे. उर्मिला मातोंडकर यांनी निवडणूक लढवली म्हणजे त्यांनी चाळीस वर्ष अभिनय सृष्टीत केलेले काम संपलं का? असा संतप्त सवाल धनंजय यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे

You might also like