अलाहाबाद HC चा योगी सरकारला सल्ला, म्हणाले – ‘UP तील परिस्थिती हाताबाहेर, 2 आठवड्यांच्या Lockdown चा विचार करावा’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ऑक्सिजन, इंजेक्शन, बेड्स, औषधांचा तुटवडा जाणवत आहे. अशातच उत्तर प्रदेशातील परिस्थितीही नियंत्रणाबाहेर गेली आहे. याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा योगी सरकारला सल्ला दिला आहे. एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान मंगळवारी (दि. 27) हायकोर्टाने योगी सरकारला हे निर्देश दिले. राज्यात ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय सुविधांचा तुटवडा लक्षात घेऊन लॉकडाऊन आणि इतर पर्याय शोधावे असे सांगितले. राज्यातील स्थिती हाताबाहेर गेली आहे, त्यामुळे 2 आठवडयाचा लॉकडाऊनचा विचार करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील कोरोना संकटावरील खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात झाली. त्यावेळी वर्मा म्हणाले की, मी पुन्हा विनंती करतो, जर परिस्थिती नियंत्रणात नसेल तर दोन आठवड्यांचा लॉकडाउन लावण्यास उशीर करू नका. कृपया आपल्या धोरण निर्मात्यांना हे हे सूचवा. काही गोष्टी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे ते म्हणाले. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, ऑक्सिजनची कमतरता आहे. कागदावर सर्व काही अलबेल असल्याचे दाखवले जात आहे. परंतु प्रत्यक्षात सुविधांचा अभाव असून ही गोष्ट कोणापासून लपून राहिली नसल्याचे न्यायमूर्ती वर्मा म्हणाले. त्यामुळे आपली विवेकबुद्धी वापरा, अशी आम्ही हात जोडून विनंती करतो असे ते म्हणाले. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 5 शहरांमध्ये लॉकडाउन लावण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यानंतर आठवडाभरातच हायकोर्टाचे निर्देश दिले आहे. गेल्या आदेशात हायकोर्टाने सरकारला लखनऊ, प्रयागराज, वाराणसी, आग्रा, कानपूर नगर आणि गोरखपूरमधील परिस्थिती सामान्य करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याबाबत सांगितले होते. या शहरातील प्रमुख सरकारी रुग्णालयात दिवसातून दोनदा आरोग्य बुलेटिन देण्याची व्यवस्था सुरु करावी, असे सांगितले होते. जेणेकरून लोकांना रूग्णांचे आरोग्य स्थिती कळेल आणि रुग्णालयात जाण्याचे टाळता येईल, असे कोर्टाने निर्देश दिले होते.