महामार्गावरील भीषण अपघातात 3 मित्रांचा मृत्यू तर 2 जखमी

उन्नाव : वृत्तसंस्था – उन्नाव जिल्ह्यातील लखनऊ-कानपुर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात लखनऊ येथून येणाऱ्या तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत तिघेजण कानपुर येथील रहिवाशी आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.

कानपुर येथील हरीश गुरुवानी (रा. गोविंद नगर) यांचा डीजे चा व्यवसाय आहे. शनिवारी लखनऊ येथील रमाडा येथे एका कार्यक्रमासाठी डीजे पाठवण्यात आला होता. हरीश यांनी डीजेवर काम करणारे कामगार सचिन सैनी (वय – 23) सत्यनारायण सैनी (वय – 24) शिवकुमार गुप्ता आणि त्याचा साथिदार राजेश गुप्ता (वय – 35) यांना रमाडा येथे पाठवले होते.

रात्री उशिरा कार्यक्रम संपल्यानंतर हे सर्वजण डीजे घेऊन घरी परतत होते. त्यावेळी पहाटे चारच्या सुमारास लखनऊ – कानपूर महामार्गावरील शेखपुर नरी येथे वाहन पलटी झाले. सचिन, रजत आणि राजेश हे तिघे पलटी झालेले वाहन सरळ करत असताना पाठिमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सुमित आणि रोहित हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.