Pune : देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा, म्हणाले – ‘जून नंतर लसींचा उपलब्धतेचा प्रश्न सुटणार’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्यात लसीचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली आहे. दरम्यान जूननंतर लसींचा उपलब्धतेचा प्रश्न सुटेल असा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पुण्यातील नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि. 22) एका ऑनलाईन कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी फडणवीस म्हणाले की, या लाटेत सर्वात जास्त ऑक्सिजनची कमतरता जाणवली. सर्व ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी द्यावा लागला. मोदींनी ऑक्सिजनची नीट व्यवस्था लावली. प्लांट इम्पोर्ट करणे हा त्यावरचा मार्ग होता आणि हे केल्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन. पंतप्रधानांचा पुढाकाराने 800 ऑक्सिजन प्लांटची निर्मिती होत आहे. या लाटेत सर्वाधिक फटका बसलेल्या ठिकाणात पुणे होते. पुण्यानी इतका ताण असूनही टेस्टिंग कमी होऊ दिले नाही. आता संख्या आटोक्यात आली असली तरी तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागणार असल्याचे ते म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, सध्या जो गोंधळ सुरू आहे त्यावरून काही मार्ग काढला पाहिजे. चांगल काय करता येईल ते पाहिले पाहिजे. महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, मध्यंतरी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे 8 ऑक्सिजन प्लांट शहरात तयार केले आहेत. थेट अमेरिकेतून या ऑक्सिजन प्लांटसाठी साहित्य आणले असून पुढची लाट आलीच तर महापालिका आत्मनिर्भर होणार आहे.