भरत भेटीवर ‘कोरोना’चं ग्रहण, काशीमधील 477 वर्षाची जुनी परंपरा होणार खंडित

वाराणसी : वृत्तसंस्था – अध्यात्माची नगरी काशी म्हणजेच वाराणसीत कोरोना महामारीच्या काळामुळे शेकडो वर्षांच्या जुन्या परंपरांना सुद्धा ग्रहण लागले आहे. आता नाटी ईमलीची जगप्रसिद्ध भरतभेट सुद्धा कोरोनामुळे यावर्षी आयोजित करता येणार नाही. जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा धोका पाहता याच्या आयोजनाला परवानगी नाकारली आहे. 477 वर्षात प्रथमच असे होईल, जेव्हा भरतभेट आयोजित होणार नाही.

नाटी ईमलीमध्ये भरतभेटीचे आयोजन दसरा सणाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे एकादशीला होते. भरतभेट पाहण्यासाठी लाखो लोकांची येथे गर्दी उसळते. प्रभु श्रीराम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांची भेट पाहण्यासाठी उसळणारी ही लाखोंची गर्दी यावेळी आयोजनात अडचण ठरली आहे. भरतभेट करणारे चित्रकुट रामलीलाचे व्यवस्थापक मुकुंद उपाध्याय यांनी सांगितले की, या लीलेची सुरूवात विक्रम संवत 1600 मध्ये झाली. सध्या विक्रम संवत 2077 सुरू आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाचे हे 477 वे वर्ष होते.

त्यांनी सांगितले की, असे समजले जाते की, ही लिला पाहण्यासाठी स्वत: देवता स्वर्गातून पृथ्वीवर उतरतात. याची सुरूवात रामचरित मानसचे रचनाकार तुळशी दासांचे समकालीन आणि त्यांचे मित्र मेधा भगत यांनी केली होती. असे म्हटले जाते की, तुळशी दास यांचे निधन झाल्याने मेधा भगत दुखी होऊन अयोध्येला गेले. मेधा भगत शरयू किनार्‍यावर बसले होते, तेव्हा राजकुमारांसारखी दिसणारी काही मुले त्यांच्याजवळ आली आणि धनुष्यबाण देऊन निघून गेली. मेधा भगत तीन दिवस तिथेच बसून वाट पहात होते, परंतु मुले परत आली नाहीत. मेधा भगत यांना स्वप्नात संदेश मिळाला की, काशीला जाऊन चित्रकूट नावाच्या ठिकाणी रामलीलाची सुरूवात कर. भरतभेटीच्या दिवशी भगवान श्रीरामाचे दर्शन होईल.

मुकुंद उपाध्याय यांनी सांगितले की, भरत भेटीच्या दिवशी मेधा भगत यांना प्रभु श्रीरामांचे दर्शन झाले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला. पावणे पाचशे वर्षाच्या इतिहासात अनेक महामारी आणि अडथळे आले, परतु या लीलाचे आयोजन कधीही थांबले नाही. कोरोनामुळे सार्वजनिक आयोजनांवर प्रतिबंध आहे, यासाठी यावेळी भरतभेटीत भगवान श्रीरामाच्या दर्शनापासून भाविक वंचित राहतील. रामलीला स्थगित करता येणार नाही, यासाठी शहराच्या लोहटिया येथील अयोध्या भवनातूनच भरतभेटसह सर्व लिलांचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये भाविकांना प्रवेश नसेल.

उपाध्याय यांनी हा निर्णय खुप दु:खी करणारा असल्याचे म्हटले. ते म्हणाले, बिहार निवडणुकीसाठी मोठ-मोठ्या रॅली होत आहेत, परंतु रामलीला आणि भरतभेटीसाठी परवानगी दिली जात नाही. आम्ही मिरवणूक न काढण्यास तयार आहोत, केवळ प्रशासनाने परवानगी द्यावी, ज्यामुळे परंपरा खंडित होणार नाही. परंतु आमची मागणी ना सरकार ऐकत आहे, ना प्रशासन, असे उपाध्याय म्हणाले.