Pune News : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत : मुख्यमंत्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ऊस संशोधनामध्ये अग्रेसर असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे राज्याबरोबरच देशभरात निर्माण व्हावीत तसेच या केंद्रांचा विस्तार जगभरात व्हावा, अशी सदिच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ( Vasantdada Sugar Institute) 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (शनिवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पार पडली.

ऑनलाइन सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), कामगारमंत्री तथा संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ऊस संशोधन क्षेत्रात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कार्य मोठे आहे. कृषी, उद्योग आणि शिक्षणावर आधारलेल्या या संस्थेचा गौरव आपण सर्वजण जाणतो आहोत. या संस्थेची पाहणी करुन येथील संशोधनाबाबत सविस्तर माहिती घेण्याची इच्छा असल्याचे सांगून त्यांनी सांगितले, शेतीला विज्ञानाची जोड देऊन आपली प्रगती साधता येते, हे या संस्थेने सिद्ध करुन दाखवले असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ऊस उद्योग क्षेत्रात प्रयोगशील असणाऱ्या या संस्थेचा विस्तार जगभरात होणे गरजेचे असून यासाठी संस्थेच्या नियामक मंडळासह आपण सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. अनुभव संपन्न आणि दूरदृष्टी असणाऱ्या शरद पवार यांचा अनुभवाचा उपयोग आपण विकासासाठी करुन घ्यायला हवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार म्हणाले, मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पाथरवाला येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूचे विभागीय संशोधन व विकास प्रक्षेत्र मंजूर झाले आहे. हे केंद्र सुरु झाल्यावर ते राष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त करुन त्यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हे केंद्र लवकर तयार होऊ शकेल, असे शरद पवार यांनी सांगितले.