चंदन तस्कर विरप्पनच्या मृत्यूनंतर 15 वर्षांनी पोलिसांनी त्याच्या महिला सहकार्‍याला केलं अटक

बेंगळूरू : वृत्तसंस्था – सुमारे 15 वर्षांपूर्वी ऑपरेशन कोकूनमध्ये चंदन तस्कर विरप्पनला तामिळनाडुच्या जंगलात मारण्यात आले होते. रविवारी त्याच्या टोळीतील एका महिला सहकार्‍याला पोलिसांनी कर्नाटकमध्ये अटक केली. पोलिसांनी सांगितले की, विरप्पनची महिला सहकारी स्टेला मेरी (40) हिला कोल्लेगा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चमराजनगर जिल्ह्यातील जागेरी गावातून अटक केली. ती मागील 27 वर्षांपासून फरार होती.

दहशतवादी आणि फुटीरतावादी कृत्य प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर स्टेल्ला 1993 पासून फरार आहे. स्टेल्लाच्या अटकेबाबत पोलीस अधीक्षक एच. डी. आनंदा कुमार म्हणाले, विरप्पनची जवळची साथीदार असलेल्या स्टेल्लाने हत्तींना शेतातून पळवून लावण्यासाठी गोळीबार केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आले. यावेळी तिला चौकशीत विचारण्यात आले असता सर्व प्रकार उघड झाला. पोलिसांनी तिला विचारले की, तुला बंदूक चालवण्याची माहिती कशी आहे, तेव्हा तिने आपण विरप्पनच्या टोळीत पूर्वी असल्याची कबुली दिली.

पोलीस म्हणाले, स्टेल्लाने तिच्या पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर एका दुसर्‍या व्यक्तीशी विवाह केला आहे. तिचा पहिला पती वेल्लायन याचा आजारपणात मृत्यू झाला होता.

वेल्लायनचा मृत्यू झाल्यानंतर स्टेल्लाने जागेरी येथील वेलूस्वामीशी लग्न केले. हे दाम्पत्य चेन्नीपुरादोद्दी येथे भाड्याने घेतलेल्या जमिनीत ऊसाची शेती करतात. स्टेल्लावर टाडा अंतर्गत आणखी 3 गुन्हे दाखल आहेत. पालार बॉम्ब स्फोट, बेकायदेशिर शस्त्रांची वाहतूक आणि रामपूरा पोलीस ठाण्यावरील हल्ल्याचे हे तीन गुन्हे आहेत.

काल्लीगलचे पोलीस उप अधीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने स्टेल्लाला अटक केल्यानंतर तिला न्यायालयासमोर उभे करण्यात आले. तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.