‘शिवसेना नव्हे ही तर औरंगजेब सेना’, भाजपाची बोचरी टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करावे अशी चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने सूपर संभाजीनगर घोषणा केली आणि संभाजीनगर नामांतरण झाले पाहिजे अशी मागणी केली. पण जेंव्हा प्रत्यक्ष नामांतरणाची वेळ आली की त्यांच्या वृत्ती आणि कृतीत फरक दिसतो. शिवसेनेचे संभाजीनगरबद्दल धोरण पाहिले तर औरंगजेबाच्या वृत्तीची आठवण येते, ही शिवसेना नसून औरंगजेबची सेना आहे अशी बोचरी टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

उपाध्ये म्हणाले की, औरंगजेबने छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यापद्धतीने बोलावले आणि जी वागणूक दिली. त्यानंतरचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. शिवसेनेची बोलायची भाषा एक आणि ज्या ज्या वेळी प्रत्यक्ष कृती करायची वेळ येते तेव्हा शिवसेना औरंगजेबाप्रमाणे वागते, त्यामुळे शिवसेनेला औरंगजेब सेना म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रत्यक्ष नामांतरणावेळी शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली असल्याचे ते म्हणाले.

1995 मध्ये पहिल्यांदा औरंगाबाद महापालिकेत संभाजीनगर नामांतरण करण्याचा प्रस्ताव आला होता. या प्रस्तावाला तेंव्हाचे संभाजीनगरचे पालकमंत्री चंद्रकांत खैरे, जालनाचे पालकमंत्री हरिभाऊ बागडे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात मांडला, त्याला युती सरकारने मंजुरी दिली, त्यानंतर काँग्रेस नगरसेवक मुश्ताक अहमद जे सध्या राष्ट्रवादीत आहेत, ते हायकोर्टात गेले. तेथे हायकोर्टाने त्यांचे म्हणण फेटाळले. त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते, त्यांनी सुप्रीम कोर्टात नामांतरणाची सूचना मागे घेत असल्याचे सांगितले अशी माहिती केशव उपाध्येंनी दिली.

त्याचसोबत 2011 मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अशाप्रकारचा प्रस्ताव आला, त्याकाळातही आघाडी सरकारने हा प्रस्ताव पुन्हा फेटाळला, एकदा नव्हे दोनदा काँग्रेस राष्ट्रवादीने हा प्रस्ताव फेटाळला. 2017 ते 2020 या काळात सातत्याने औरंगाबद महापालिकेत भाजपा औरंगाबादचे नामांतरण संभाजीनगर करावे असा प्रस्ताव आणण्याची मागणी केली. 20 डिसेंबर 2019 रोजीही भाजपाने स्मरण पत्र पाठवून शिवसेनेला आठवण करून दिली. मात्र प्रत्यक्षात हा प्रस्ताव शिवसेनेने महापालिकेत दाखल करून घेतला नाही. बोर्डावरदेखील प्रस्ताव ठेवला नाही. भाजपा नगरसेवक राजू शिंदे यांनी पुन्हा स्मरण पत्र पाठवून चौथ्यांदा प्रस्तावाची आठवण करून दिली, त्यावर शिवसेनेच्या महापौरांनी वारंवार स्मरण पत्र देऊ नये असे भाजपा नगरसेवकाला बजावले आहे. ते महापालिकेच्या इतिवृत्तात आहे असा आरोप केला. ज्यांची प्रामाणिक इच्छा असते, ते अशाप्रकारे वेळकाढूपणा करत नाहीत. औरंगाबाद नामांतरणाची प्रत्यक्ष वेळ आली तर शिवसेनेची वृत्ती आणि कृती यात फरक दिसतो. त्यामुळे औरंगजेबाची वृत्तीप्रमाणे शिवसेना कृती करतेय असा आरोप केशव उपाध्येंनी केला आहे.