‘तरी आम्ही सांगितले होते, पवारसाहेबांचा नाद नाय करायचा !’ : धनंजय मुंडे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभा निवडणुकीच्या वेळी फोडाफोडी करणाऱ्या भाजपला आम्ही सांगितले होते की, पवारसाहेबांचा नाद करू नका. पण ते सुधारणार नाहीत. आता पवारसाहेब की लाठी ऐसी बैठी है, बहुत दिनों के बाद पता चला है की कैसी बैठी है, असा सणसणीत टोला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Social Justice Minister Dhananjay Munde) यांनी भाजपला लगावला आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आंबाजोगई येथे आयोजित सभेत मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार आसूड ओढले. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर मला एकाने विचारले लोकशाही म्हणजे काय, मी त्याला म्हणालो, राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर या देशाला खरी लोकशाहीची ताकद कळली आहे. 56 आमदारांच्या पक्षाचा मुख्यमंत्री, 54 आमदार असलेल्यांचा उपमुख्यमंत्री होतो, 44 आमदार असलेल्या पक्षाचे मंत्री होतात. आणि 105 आमदारांचा विरोधी पक्षनेता होतो, याला लोकशाही म्हणतात. पवारसाहेबांनी हे दाखवून दिले असून, त्यांचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला गर्व असल्याचे मुंडे म्हणाले.

तसेच कोरोनापासून स्वत:ला व आपल्या कुटुंबाला आपण वाचवतोय. त्याचप्रमाणे भाजपच्या संसर्गातूनसुद्धा तुम्हाला यापुढे आपल्या कुटुंबाला दूर ठेवावे लागणार असल्याचा खोचक टोलाही मुंडे यांनी हाणला, तर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, भाजपवाले रोज मंदिरात जातात. सर्वांत जास्त पापी यांच्याच पक्षात आहेत. लोकांच्या मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱ्यांनी मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करावे का? असा सवाल मिटकरी यांनी केला आहे.