राज्यमंत्री शिवतारेंची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नये – विनय शिवतारे

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) – राज्यमंत्री विजय शिवतारे यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचे कुठलेही कारण नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये अशी माहिती राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे चिरंजीव विनय शिवतारे यांनी दिली आहे.

ना. शिवतारे यांनी शनिवार दि. १७ रोजी तालुक्यात दिवसभर विविध कार्यक्रम पार पाडले. सायंकाळी ५ च्या सुमारास घरी येऊन त्यांनी जेवण केले. जेवणानंतर दवणेमळा व जवळार्जुन आदी गावात निर्धारित कार्यक्रमांसाठी निघायची तयारी चालू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. याबाबत तात्काळ चिंतामणी हॉस्पिटलचे डॉ. आत्राम यांना कळविण्यात आले. आत्राम यांनी तपासण्या केल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ना. शिवतारे यांचे चिरंजीव विनय यांनी शिवतारे यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

विनय शिवतारे म्हणाले, २०१२ साली केलेल्या उपोषणानंतर त्यांची किडनी दुखावली होती. त्यानंतर वरचेवर उपचार करून डॉक्टरांनी किडनीचे कार्य व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी अधूनमधून शिवतारे यांना त्रास जाणवतो. यावेळी मात्र किडनीचे कार्य बिघडल्यामुळे त्याचा परिणाम हृदयावर होत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शनिवारी ते अस्वस्थ जाणवले. ते अतिदक्षता विभागात असून गुरुवारी सर्व चाचण्यांचे अहवाल पाहून पुढील उपचाराबाबत डॉक्टर निर्णय घेणार आहेत असेही विनय शिवतारे म्हणाले.

हॉस्पिटलमध्ये भेटण्यास परवानगी नाही
दरम्यान शिवतारे यांना भेटण्यास रुग्णालय प्रशासनाने परवानगी दिलेली नसल्याने हॉस्पिटलमध्ये गर्दी करू नये. ते लवकरच त्याच तडफेने कार्यरत होतील असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केल्याचे तालुकाप्रमुख दिलीप यादव यांनी सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like