मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्याइतक्या पंकजा मुंडे मोठ्या झाल्या ? : विनायक मेटे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारख्या माणसाला पंकजा मुंडेंनी वेठीस धरले. जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्या येवढ्या त्या मोठ्या झाल्या का ? अशी टीका शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगून देखील त्या ऐकत नाहीत, आणि आम्हाला सांगायला लावतात हे अतिशय दुर्दैवी असल्याचे प्रत्युत्तर विनायक मेटेंनी पंकजा मुंडेंना दिले.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची भाजपा पालकमंत्री पंकडा मुंडे यांनी शिल्लकच ठेवली नाही. फक्त शिवसंग्रामच नाही तर जुने भाजपासोबतचे नेते आणि गोपीनाथ मुंडेंचे सहकारी आज कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे आम्ही मुंडे साहेबांच्या भाजपासोबतच आहोत. मुख्यमंत्र्यांसोबत आहोत, असेही मेटे म्हणाले.

आमची माणसं फोडली. साडेचार वर्ष त्रास दिला तरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणून आम्ही मदत करायला तयार होतो. मात्र कुठल्याच प्रकारचं निमंत्रण न दिल्यामुळे आम्ही ही भूमिका घेतली आहे. आम्ही महायुतीमध्ये आहोत. फक्त पंकजा मुंडे कोणासोबत आहेत? कोणासाठी काम करतात आणि कोणत्या महत्त्वाकांक्षेसाठी काम करतात? हे त्यांनी बघावं’ असा टोला विनायक मेटे यांनी पंकजा मुंडेंना लगावला आहे.