व्हायरल व्हिडीओमुळे ‘गुजरात मॉडेल’चे पितळ उघडे, रुग्णालयाबाहेर अ‍ॅम्ब्युलन्सची मोठी रांग (व्हिडीओ)

अहमदाबाद : वृत्तसंस्था –   देशाच्या विविध भागात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर होत आहे. अनेक राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम आता हॉस्पिटलवर होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना बाधित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. गुजरातमधील असाच एक व्हिडीओ समोर आला असून यातून गुजरातमध्ये कोरोनाची स्थिती किती भयंकर झाली आहे आहे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये हॉस्पिटलच्या बाहेर रुग्णांना घेऊन आलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सची भली मोठी रांग लागल्याचे दिसून येत आहे. कोरोना बाधित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती होण्यासाठी वाट पहावी लागत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

गुजरातमध्ये कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होताना पहायला मिळत आहे. त्याचा परिणाम हॉस्पिटलवर होऊ लागला आहे. अहमदाबादमधील एका सरकारी हॉस्पिटलच्या बाहेर अ‍ॅम्ब्युलन्सच्या रांगा लागल्या आहेत. रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वाट पहात आहेत. जवळपास 1200 बेडचे हे हॉस्पिटल असून ते देखील फूल्ल झाला आहे. त्यामुळे अ‍ॅम्ब्युलन्समध्ये रुग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे.

देशात महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात गुजरातमध्ये 6021 रुग्ण आढळून आले आहेत तर 55 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद, सूरत आणि राजकोट या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. या शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने गुजरात उच्च न्यायालयाने विजय रुपाणी सरकारला धारेवर धरले आहे. सध्या देशामध्ये सर्वाधिक लस पुरवठा गुजरात राज्याला होत असल्याचे माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. त्यानंतरही गुजरात राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने गुजरात उच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहेत. देशभरात गुजरात मॉडेलची चर्चा सुरु असताना हा व्हिडीओ समोर आल्याने गुजरात मॉडेलचे पितळ उघडे पडले आहे.