कुणालाही मतदान करा, पण भाजपला नको; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे आवाहन

कोलकता : कोणत्याही पक्षाला मतदान करा पण भाजपला करू नका असे आवाहन भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी उपस्थितांना केले. कोलकत्यामधील भवानीपूर भागामध्ये आयोजित किसान महापंचायतीमध्ये त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. राकेश टिकैत यांनी पश्‍चिम बंगालमधील रणधुमाळीमध्ये एंट्री केली आहे.

क्रांतिकारकांच्या भूमीतून आम्ही ही लढाई पुढे नेत आहोत, केंद्र सरकार कृषी कायदे रद्द करत नाही तोवर आम्ही माघार घेणार नाही. सध्या निवडणुकीमुळे सगळे केंद्र सरकार येथे आले आहे. सरकारचं आमच्यासोबत चर्चा करायला तयार नसल्याने आम्ही हे आंदोलन आठ महिने देखील सुरू ठेवण्यास तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी जिथे जातील तिथे आम्ही त्यांचा पाठलाग करू असेही ते म्हणाले. आम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थन करायला आलेलो नाहीत, भाजपला धडा शिकवणे हाच आमचा उद्देश आहे. आम्ही काय म्हणतो आहोत हे सरकारला सांगण्यासाठी त्यांना निवडणुकीत धडा शिकवणार आहोत, असे शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी सांगितले.