मतदार नोंदणीसाठी ‘या’ दिवशी शेवटची संधी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी निवडणूक आयोगाने दिली आहे. मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवारी (२ मार्च) आणि रविवारी (३ मार्च) रोजी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
मतदार नोंदणीची ही शेवटची संधी आहे. या मोहिमेत नोंदणी करणाऱ्या मतदारांची नावे आगामी निवडणुकपूर्व यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. दोन व तीन मार्च रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकारी मतदार नोंदणीबाबत अर्ज स्वीकारणार आहेत. यामध्ये मतदार नोंदणी, दुरुस्ती, वगळणीसाठी अर्ज करता येणार आहे. निवडणुकीसाठी मतदार म्हणून नोंदणी केलेली नाही अशा नागरिकांना मतदार नोंदणीसाठी ‘वोटर व्हेरिफिकेशन अँड इन्फर्मेशन प्रोग्राम’ याअंतर्गत भारत निवडणूक आयोगाने २३ व २४ फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम राबविली होती. त्यानंतर दोन व तीन मार्च रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकारी मतदार नोंदणीबाबत अर्ज स्वीकारणार आहेत
ऑनलाइन नावनोंदणीची सुविधा –
www.ceo.maharashtra.gov.in या वेबसाइटवर अधिक माहिती घेता येईल.
मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या वेबसाइटवर ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधा
नोंदणीविषयी अधिक माहितीसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध
अशी करा नावनोंदणी –
प्रत्येक मतदार केंद्रावर मतदार नोंदणीसाठी शिबिराचे आयोजन.
मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारतील.
‘बीएलओ’कडे अर्ज क्रमांक ‘६’, ‘७’, ‘८’ व ‘८ अ’ हे अर्ज उपलब्ध असतील.
मतदारांना हे अर्ज भरून ‘बीएलओ’कडे देता येईल.
नोंदणी झाल्यावर मतदारांची नावे निवडणूकपूर्व मतदार यादीत समाविष्ट करण्यात येईल.