वाधवान बंधूंचा जेलमधील मुक्काम 8 मे पर्यंत वाढला, CBI कोठडीत वाढ

पोलिसनामा ऑनलाईन टीम – येस बँकेचे सर्वेसर्वा राणा कपूर यांच्यासोबत वाधवान यांचे संबंध आणि येस बँक घोटाळ्यामागचं षडयंत्रााचा खोलवर तपास होणे आवश्यक आहे. त्यामुळे कपिल आणि धीरज या वाधवान बंधूंची कोठडी सीबीआयने वाढवून मागितली. त्यानुसार सीबीआय कोठडीत 8 मेपर्यंत वाढ देण्यात आली. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं त्यांना 8 मेपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

तपासयंत्रणेने दोघांची कोठडी संपत असल्याने शुक्रवारी त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले होत. याप्रकरणी येस बँकेचे सर्वेसर्वा राणा कपूर यांच्यासोबत वाधवान यांचे संबंध आणि येस बँक घोटाळ्यामागचे षडयंत्र याचा खोलवर तपास होणे गरजेचे आहे. त्यामुळे कपिल आणि धीरज या वाधवान बंधूंची कोठडी सीबीआयने वाढवून मागितली.

वाधवान यांच्यावतीनं सीबीआयच्या या मागणीचा विरोध करण्यात आला होता. मात्रा, मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने वाधवान बंधूंची सीबीआय कोठडी आणखीन सात दिवसांनी वाढवून दिली. जामीनावर असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही विशेष परवानगी काढत महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास केल्यामुळे वाधवान बंधू काही दिवसांपूर्वी नव्याने वादात अडकले होते.

कुख्यात गँगस्टर इक्बाल मिर्चीची मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी ईडीने जानेवारीत कपिल वाधवानला अटक केली होती. मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच येस बँकेच्या 37 हजार कोटींच्या कर्ज मंजुरीच्या बदल्यात त्याने बँकेचा प्रमुख राणा कपूर व त्यांच्या कुटुंबियाच्या परदेशातील बँक खात्यावर 600 कोटींची लाच दिल्याचे तपासातून स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांच्याविरोधात सीबीआयनं 7 मार्च रोजी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.