पुण्यातील ‘खडकमाळ’ आळीतील वाड्याची भिंत कोसळली, दोन दिवसात तीन घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुुरुवार पेठेतील खडकमाळ आळी गणपती समोरील नाईक वाड्याची भिंत शनिवारी सकाळी कोसळली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना शनिवारी सकाळी पावणे सात वाजता घडली. गेल्या दोन दिवसात जुन्या वाड्याची भिंत कोसळण्याची ही तिसरी घटना आहे.
खडकमाळ आळीतील नाईक वाडा हा अतिशय जुना वाडा आहे. या ठिकाणी काही लोक रहात होते. सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास वाड्याच्या एका बाजूची भिंत जेथे लोक रहात होते, ती कोसळली. सुदैवाने ही भिंत बाहेरील बाजूला पडल्याने त्यात कोणीही जखमी झाले नाही.

बुधवार पेठेतील मोती चौकाजवळील पायगुडे वाड्याची एका बाजूची भिंत शुक्रवारी रात्री कोसळली. त्यात कोणी जखमी झाले नाही़ मात्र, त्यात मामा पायगुडे व त्यांच्या कुटुंबातील ४ जण अडकले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांची सुटका केली. गणेश पेठेतील बोरा हॉस्पिटलसमोरील जुन्या वाड्याची भिंत गुरुवारी रात्री कोसळली. भिंत पडत असल्याचे दिसताच तेथील आई व मुलगा बाहेर पडल्याने ते वाचले होते.

गेल्या रविवारी राष्ट्रभूषण चौकातील जुन्या वाड्याची भिंत कोसळून त्यात चार जण अडकले होते. त्यांना अग्निशामक दलाने सुखरुप बाहेर काढले. या आठवड्यात एकूण चार घटना घडल्या. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही.

आरोग्यविषयक वृत्त –