पाण्याचा अतिवापर करणाऱ्या पुणेकरांना शिक्षा… आता मिळणार निम्मेच पाणी…!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आधीच पुणेकरांवर पाणी कपातीची कुऱ्हाड कोसळली आहे त्यात आता आणखी भर पडली आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार २०१७ च्या लोकसंख्येनुसार प्रत्येक दिवसाला ६५० एमएलडी, म्हणजेच सध्याच्या वापरापैकी निम्मेच पाणी मिळणार आहे. त्यामुळे पुण्यावरील पाणी संकट आणखी तीव्र होणार असे दिसते आहे. या नियमाची अंमलबजावणी जलसंपदाकडून आदेशाची प्रत मिळताच होणार आहे. त्यामुळे आता या आदेशाविरोधात महापालिकेला उच्च न्यायालयातच दाद मागावी लागणार आहे. पाणीप्रश्‍नावर शुक्रवारी पक्षनेत्यांची बैठक होणार असून, त्यापूर्वी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची तातडीची बैठक होत आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे.
शेतीसाठी कमी मिळतंय पाणी
पुण्यातील लोकसंख्येसाठी ठरवून देण्यात आल्यापेक्षा जादा पाणी वापर होत असल्याने, शेतीसाठी कमी पाणी मिळत असल्याबाबत बारामती येथील शेतकरी विठ्ठल जराड यांनी जलसंपदा विभागात याचिका दाखल केली होती. महापालिकेने २०१७ मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये शहराची लोकसंख्या ४० लाख ७६ हजार असल्याची नोंद होती. प्रतिमाणशी प्रतिदिन १५५. २५ लिटर पाणी, या निकषानुसार एवढ्या लोकसंख्येला प्रतिदिन ६५० एमएलडी पाणी पुरेसे असल्याचा दावा जराड यांनी याचिकेत केला होता. यावर मुख्य अभियंता टी. एन. मुंडे यांच्यासमोर सुनावणी झाली. जराड यांची मागणी ग्राह्य धरून महापालिकेने ६५० एमएलडी इतकेच पाणी घेण्याचा निकाल मुंडे यांनी दिला होता.या निकालावर महापालिकेने जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे दाद मागितली होती. यावर प्राधिकरणाच्या खंडपीठासमोेर गुरुवारी अंतिम सुनावणी होऊन, वरील निकाल कायम ठेवत जराड यांची मागणी मान्य करण्यात आली. लोकसंख्येच्या तुलनेत महापालिका जादा पाणी घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. जलसंपदा विभागाने नव्याने पाण्याचे नियोजन करून पुण्यासाठीचा कोटा निश्‍चित करावा, यावर महापालिकेला आक्षेप असल्यास प्राधिकरणाकडे दाद मागावी, असा आदेश देण्यात आल्याची माहिती जलसंपदाच्या अधिकार्‍यांनी दिली.पालिकेची पाणीकोंडी..!
महापालिकेकडून सध्या दररोज १ हजार ३५० एमएलडी पाणी घेण्यात येत आहे. गुरुवारी महापालिकेने तब्बल १ हजार ५६६ एमएलडी पाणी उचलले. प्राधिकरणाच्या निर्णयामुळे आता केवळ ६५० एमएलडी इतकेच पाणी मिळणार आहे. त्यातच पाण्याची गळती २२२ एमएलडी इतकी आहे. म्हणजे महापालिकेला प्रत्यक्षात केवळ ४१३ एमएलडी इतकेच पाणी मिळणार आहे. याचाच अर्थ सुमारे 1 हजार एमएलडी इतके पाणी कमी मिळणार असल्याने आता महापालिकेची पाणीकोंडी झाली आहे.