खडकवासल्याचे पाणी तरंगवाडी तलावात पोहचलं

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – राज्याचे मुख्यंमंत्री देवेंद्र फडणविस यांनी इंदापूर तालुक्यातील कैरडे तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदामंत्री गीरीष महाजन यांना दिल्यानंतर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत खडकवासला धरणातुन तरंगवाडी तलावासाठी सोडलेले पाणी तरंगवाडी तलावात पोहचताच राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तलावाच्या ठीकाणी पाण्याचे जलपूजन करण्यात आले.

भिगवण येथील महाजनादेश यात्रेच्या जाहीर सभेत हर्षवर्धन पाटील यांनी खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यात तरंगवाडी ते मदनवाडी पर्यंतच्या सर्व १९ पाझर तलावात पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीवर सदर सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना आदेश दिला होता. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार पाणी आले असून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन हर्षवर्धन पाटील यांनी या जलपूजन प्रसंगी केले.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले,’ मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार गेल्या तीन दिवसापूर्वी पुणे येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत इंदापूर तालुक्यातील पाण्याच्या नियोजनासंदर्भात मीटिंग घेतली. त्यामध्ये तलावात पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले. इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथे खडकवासला कॅनॉलची तालुक्याची हद्द सुरू होते. तिथे सद्या ४३५ क्युसेक्स विसर्ग येत असून पुढे ४३५ क्युसेक्स विसर्गाने पाणी तालुक्यात येत आहे. इंदापूर तालुक्यात तरंगवाडी ते मदनवाडी दरम्यान १९ पाझर तलाव असून येथील तलावांमधून पंधरा ते सोळा हजार एकराचे जलसिंचन क्षेत्र आहे.

तरंगवाडी तलावावर गोखळी, झगडेवाडी, तरंगवाडी, वडापुरी, विठ्ठलवाडी तसेच इंदापूर नगरपरिषदेची पाणीपुरवठ्याची योजना आहे. पहिल्या टप्प्यात २५ ते ३० टक्के पाणी भरले जाईल तसेच दुसऱ्या टप्प्यात देखील २५ ते ३० टक्के पाणी भरून भरले जाईल.

एक महिन्यांमध्ये १९ पाझर तलाव भरून देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आनंद एकाच गोष्टीचा आहे की शेतकऱ्यांना पाणी मिळाले आहे. इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांचे हास्य हेच आमचे लक्ष आहे.’
यावेळी नीरा-भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, केशव बोराटे, शिवाजी तरंगे, दादासाहेब शिंदे, कैलास कदम, बाळासाहेब तरंगे, भिवा डोंबाळे, साईनाथ माने, सचिन बोराटे, माऊली बोराटे, मामा डोंबाळे, बापू पारेकर आदी उपस्थित होते.

Visit – policenama.com