राष्ट्रवादी आणि पवारांबाबत ‘हे’ 5 NCP चे दिग्गज आमदार म्हणतात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज सकाळी (शनिवार दि. 23 नोव्हेंबर) भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार गट आणि भाजपनं मिळून सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातील आमदारांनी पक्ष आणि शरद पवारांना घेऊन आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

1) ‘मी पक्षासोबतच आहे’ : आमदार दिलीप मोहिते (खेड, पुणे)
दिलीप मोहिते म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना मानणारा आहे. त्यामुळे पक्षाबाबत कोणी वेगळी भूमिका घेतली असेल तर त्याबाबत मी काहीही बोलणार नाही.”

2) ‘राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ रहावा’ : अतुल बेनके (जुन्नर, पुणे)
आमदार अतुल बेनके म्हणतात, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत राहो अथवा विरोधात, तो एकसंघ राहिला पाहिजे. पक्षाचे सर्व नेते एकत्र राहिले पाहिजेत.”

3) ‘मी पवारांसोबत’ : अशोक पवार (शिरूर-हवेली,  पुणे)
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार आजच जयपूरहून पुण्यात आले होते. परंतु राजकीय घडामोडी समजताच ते तडक मुंबईला रवाना झाले. आपली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “घडामोडी काहीही झाल्या असल्या तरी मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहणार आहे.”

4) ‘मी राष्ट्रवादीसोबत’ : सुनील शेळके (मावळ, पुणे)
सुनील शेळके भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झाले होते. त्यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला होता. अजित पवारांनीच शेळकेंच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. आज झालेल्या अजित पवारांच्या शपथविधीला ते उपस्थित होते. परंतु दुपारी झालेल्या शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी आपण राष्ट्रवादी सोबत असल्याचं सांगितलं. अजित पवारांना मी मानतो. परंतु शरद पवारांनीही माझ्यासाठी प्रचार केला आहे. त्यामुळे मी पक्षासोबतच राहणार आहे असे त्यांनी सांगितले.

5) आमदार भरणे पवारांच्या सोबत ? (इंदापुर, पुणे)
इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया देताना मी कार्यक्रमात आहे. मी नंतर बोलेन असं म्हणत काहीही बोलणे टाळले. भरणे हे अजित पवारांचे कट्टर व विश्वासू मानले जातात. त्यामुळे भरणे अजित पवारांच्या पाठिशी खंबीर असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

Visit : Policenama.com