ठाकरे सरकारमधील ‘या’ दिग्गज मंत्र्यांची राज ठाकरे यांना विनंती, म्हणाले – ‘आम्हाला तुमच्या प्रकृतीची काळजी’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असतानाही मराठी भाषा दिनानिमित्त मनसेने शनिवारी (दि. 27) मुंबईत शिवाजी पार्क येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मास्क घातला नव्हता. त्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काळजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, राज ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता आहे. आमची त्यांना विनंती आहे की, त्यांनी मास्क लावावा. ते आमच्या विनंतीला मान देणार नाही व मास्कही लावणार नसतील तर भविष्यात कोरोना झाला तर राज्य सरकार जबाबदार राहणार नसल्याचे ते म्हणाले.

मराठी भाषा दिनानिमित्त शिवाजी पार्कात आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात समोर प्रचंड गर्दी असतानाही राज ठाकरेंनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. तुम्ही मास्क का लावला नाही, या पत्रकाराच्या प्रश्नावरही राज ठाकरेंनी उत्तर दिले. मी मास्क लावतच नाही असे म्हणत त्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवरुन संवाद साधला. शिवजयंती किंवा मराठी भाषा दिनाच्या दिवशी कार्यक्रमाला गर्दी करु नये, या सरकारच्या निर्देशाचाही त्यांनी समाचार घेतला. राजकीय कार्यक्रमांना मंत्र्यांनी केलेली गर्दी चालते. इतकेच वाटत असेल तर निवडणुका पुढे ढकला अशा शब्दात ठाकरे यांनी टीका केली आहे.