Nana Patole : ‘संजय राऊतांना आम्ही गांभीर्याने घेत नाही अन् ‘सामना’ही वाचत नाही’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राऊत काय बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही. तसेच सामना देखील वाचत नाही. खरे म्हणजे राऊत हे नेहमीच इतरांवर टीका करत असतात. पण केवळ दुसऱ्यांवर टीका केल्याने आपला पक्ष वाढत नसतो, हे कदाचित राऊतांना माहित नसावे, असा टोला पटोले यांनी लगावला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका मांडली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय करता येईल यासाठी सध्या राज्य सरकार विविध अंगांनी विचार करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी गायकवाड आयोगानंतर आखणी एक नवीन आयोग बसवण्याच्या विचारात आहे. या मुद्द्यावरून पटोले यांनी सरकारला सुनावले आहे. यावर मार्ग ठरवण्याचा अधिकार केवळ केंद्राला त्यामुळ नवीन आयोगाने काही साध्य होणार नसल्याचे पटोले म्हणाले. पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाण साधला आहे. देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. देशात कोरोनाच्या चितेमध्ये लोक जळत असताना पंतप्रधान मात्र प्रचारात लागले होते, अशी टीकाही पटोले यांनी केली आहे.

केंद्र सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे, हे त्यांच्या पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या सूचक विधानातून स्पष्ट होते. स्वामींनी थेट देशाच्या नेतृत्वार प्रश्न उपस्थित केला आहे. कोरोनाच्या परिस्थितीत राजकारण नको, हीच आमची भूमिका असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. तसेच जनतेचे प्रश्न समजून घेऊन काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. सत्तेपेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे. त्यासाठीच आम्ही काम करत असल्याचे पटोले यांनी सांगितले.