निवडणुकीत युती 240 जागा जिंकेल, RPI ला 10 जागा हव्यात : रामदास आठवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लवकरच विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता असून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय वाटाघाटींना मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे. अनेक पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत आणि राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या मतदारसंघांची जोमाने बांधणी करताना दिसत आहेत. अशातच एकीकडे युतीच्या जागांसाठी बोलणी सुरू असताना एनडीएतील मित्रपक्षांनीही या चर्चेत उडी घेत आपल्या मागण्या रेटायला सुरूवात केली आहे. आरपीआयचे नेते आणि खासदार रामदास आठवलेंनी निवणुकांसाठी १० जागांची मागणी केली आहे.

काय म्हणाले आठवले :
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे सर्वेसर्वा यांनी आज पत्रकार परिषदेत आपली मागणी मांडली. ते म्हणाले, ‘ आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजपा-शिवसेना युतीसोबत आहोत. युती २८८ पैकी २४० जागा जागांवर विजयी होईल. आम्हाला यातील १० जागा हव्या असल्याची मागणी आम्ही मांडलेली आहे.’ येत्या काही दिवसांत युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामध्ये यामुळे शिवसेनेला १२० जागा आणि भाजपाला १६० जागा मिळण्याचे आकडे समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर छोट्या मित्रपक्षांनी जादा जागांची मागणी केल्याने भाजपसमोर पेच निर्माण होऊ शकतो.

आम्हाला भाजपच्या चिन्हावर लढायचे नाही :
आठवलेंनी याआधीही ५ सप्टेंबर रोजी युतीमध्ये १० जागांची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपच्या चिन्हावर RPI चे उमेदवार लढवण्यास नकार दिला होता. त्यांनी सांगितले होते, “भाजप आणि शिवसेनेने मित्रपक्षांना १८ जागा देण्याचा निर्णय घेतला असून, आरपीआयने त्या १८ पैकी १० जागांची मागणी केली असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आम्ही आमच्याच चिन्हावर निवडणूक लढवितो. आम्हाला भाजपच्या चिन्हावर लढायचे नाही.” यावेळी त्यांनी एक दावा करत वंचित बहुजन आघाडीमधील अनेक कार्यकर्ते आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) पक्षात येण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. नागपूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही खळबळजनक माहिती दिली होती.

You might also like