SA दौर्‍यासाठी कोणताही शब्द दिलेला नाही : BCCI

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोनामुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या बहुतांश क्रीडा स्पर्धा बंद आहेत. आयसीसी आणि अनेक क्रिकेट बोर्ड प्रेक्षकांविना सामने खेळवण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. अद्याप याबद्दल कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसून, बीसीसीआय देशात क्रिकेटची बंद पडलेली गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डही भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आफ्रिका दौरा करेल यासाठी आशादायी आहे. मात्र, त्यासाठी बीसीसीआयने कोणताही शब्द दिला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे हंगामी कार्यकारी अध्यक्ष जॅक फॉल यांनी दौर्‍याबद्दल चर्चा सुरु असल्याचे म्हटले होते. मात्र दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी बीसीसीआयने कोणताही शब्द दिलेला नसल्याचे उत्तर खजिनदार अरुण धुमाळ यांनी दिले आहे. कोरोनामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली वन-डे मालिका रद्द करावी लागली होती. त्यावेळी भविष्यात शक्य झाल्यास आम्ही दक्षिण आफ्रिकेचा दौरा करण्याचा प्रयत्न करु असे म्हणालो होतो. यासंदर्भात चर्चाही झालेली होती. परंतू यात आम्ही ऑगस्ट महिन्यात आफ्रिकेचा दौरा करुच असा कोणताही शब्द दिलेला नाही.

जोपर्यंत केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंदी उठवत नाही, तोपर्यंत बीसीसीआय कोणत्याही देशाचा दौरा करण्याबाबत अधिकृत निर्णय घेऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौर्‍यावर आणि त्यानंतर झिम्बाब्वेला जाणे अपेक्षित आहे. परंतू तो दौराही पूर्ण होईल याची आम्ही खात्री देऊ शकत नाही. हे दोन्ही दौरे आयसीसीने आखून दिलेले आहेत, हे दौरे पूर्ण होतील की नाही याबद्दल मनात शंका आहे. तर ऑगस्ट महिन्यात आफ्रिका दौर्‍याबद्दल आम्ही कसा निर्णय घेऊ शकतो असे म्हणत धुमाळ यांनी बीसीसीआयची बाजू मांडली.