फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा करताना शरम वाटली पाहिजे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन झालेल्या ट्विटर वॉरवरचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. दिग्गज खेळाडू आणि बॉलीवूड सेलिब्रिटीनी केलेल्या ट्विटमधील एकाच भाषेमुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्या. त्यामुळे मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसेच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप झाला. आता या सर्व प्रकाराची ठाकरे सरकारकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, या निर्णयानंतर भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे.

त्यानंतर फडणवीस यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे. तसेच संतापजनक, कुठे गेला मराठीबाणा कुठे गेला महाराष्ट्रधर्म, निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असेही त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील दमनशाही आणि दडपशाही विरोधात इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट करून खळबळ उडवून दिली होती. यानंतर ट्विटनंतर अनेक दिग्गज खेळाडू तसेच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत अंतर्गत मामला असल्याचे सांगत ट्विट केले. मात्र, ही ट्विट सरकार पुरस्कृत असल्याची घणाघाती देशभरातून होत आहे.