काश्मीर आणि लढाईला घेऊन मोदींचं मोठं वक्तव्य 

टोंक (राजस्थान) : वृत्तसंस्था – आमची लढाई दहशतवादाविरोधात आहे हे सांगताना आमची लढाई काश्मीरसाठी आहे, काश्मिरींविरोधात नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. काश्मीरचं प्रत्येक मूल दहशतवादाविरोधात आहे आणि त्याला आम्हाला आमच्यासोबत ठेवायचं आहे अशी ग्वाही देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांना सुरक्षेची हमी दिली.

राजस्थानमधील टोंक येथे पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांना काश्मीरी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्यावरही भाष्य केलं. पुलवामा हल्ल्यानंतर देशातील काही भागातून काश्मीरी विद्यार्थ्यांवर हल्ल्याच्या काही घटना समोर आल्या. त्यावर मोदींनी आपली भावना व्यक्त केली. यावर बोलताना, ‘देशात असं व्हायला नको,’ असं ते म्हणाले. अशी कृत्येच भारताचे तुकडे व्हावेत अशी इच्छा बाळगणाऱ्यांच्या इराद्यांना बळ देतात असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी बोलताना मोदींनी पाकिस्तानवरही जोरदार हल्ला केला. पाकिस्तानला लक्ष्य करताना ते म्हणाले की, “पुलवामा हल्ल्यानंतर शेजारच्या देशात भूकंप आलाय. जगातले बहुतांश देश आणि जवळपास सर्व आंतरराष्ट्रीय संस्था पुलवामा हल्ल्याविरोधात एकजुटीने भारताच्या बाजूने उभ्या आहेत.” असं ते म्हणाले.

यावेळी बोलताना फुटीरतवाद्यांवरही त्यांनी आपली तोफ डागली आणि त्यांच्यावरील सुरु केलेल्या कारवाईबाबतही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, “पुलवामानंतर तुम्ही पाहातच आहात की कसं एकेक करून पाकिस्तानकडून हिशेब घेतला जात आहे. आपल्या सरकारच्या निर्णयामुळे पाकला हादरे बसले आहेत. फुटीरतेची भाषा करणाऱ्यांवर कारवाई वाढवली आहे आणि पुढे देखील ही कारवाई सुरू राहणार.”