Alert ! राज्यात उष्णतेच्या लाटेसह काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह होणार वादळी पाऊस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फेब्रुवारी महिना संपत असताना राज्यामध्ये हवामानामध्ये बदल होऊन तीव्र तापमानात वाढ होत आहे. आता उन्हाळा आणखी तीव्र होण्याची लक्षणं असून हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढच्या दोन दिवसांत उष्णतेची लाटसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार आहे. त्याचवेळी राज्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याचे वेधशाळेने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट 29 फेब्रुवारी आणि 1 मार्चसाठी आहे.

या ठिकाणी बसणार उन्हाचा चटका
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढचे दोन ते तीन दिवस राज्यातील तापमान किमान 2 ते 3 अंश सेल्शिअसने वाढणार आहे. तर कमाल तापनात देखील पुढील 48 तासात वाढ होणार असून उन्हाची तीव्रता वाढणार आहे. विशेषत: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असणार आहे. तर किमान तापमानात 3 अंशाने वाढ होणार आहे. यामुळे पुढील काही दिवस रात्री आणि पहाटेच्या वेळी गारवा अनुभवता येणार नाही.

या ठिकाणी पडणार पाऊस
एकीकडे उन्हाचा चटका वाढत असताना विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी शनिवारपासून (दि.29) दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आठवड्यामध्ये गोंदिया आणि पूर्व विदर्भात गारपीट झाली होती. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते.

विदर्भात ऑरेंज अलर्ट
शनिवारी (दि.29) विदर्भात काही ठिकाणी गडगडासह वादळी पाऊस पडू शकतो. वेधशाळेने या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 1 मार्चलाही हवामान ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज आहे.

You might also like