Monsoon Updates : महाराष्ट्र-दिल्लीसह ‘या’ राज्यात आज पाऊस पडण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशाच्या दक्षिण भागात मान्सूनने वेग घेतला आहे. मान्सून चेन्नई, चित्तूर, तुमुकुरु, शिमोगा, कारवार ओलांडून पुढे जात आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासात मान्सून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात हजेरी लावू शकतो. अशात या राज्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या मान्सून कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागात सक्रिय आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते, बंगालच्या उपसागरातून कमी दाबाच्या हालचालीमुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, किनारी ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे. आकाशात गडद ढग आहेत. पुढील काही तासांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील १२ तासांत मान्सून महाराष्ट्रातील दक्षिण कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात प्रवेश करेल अशी अपेक्षा आहे. या पावसाने लोकांना उष्णतेपासून आराम मिळेल.

दिल्ली-NCR मध्ये कधी पडणार पाऊस?

सोमवारी दिल्लीत तापमान ३७.६ अंश सेल्सिअस होते, जे सर्वसामान्यापेक्षा ३ अंश कमी आहे. आयएमडीने सांगितले की, गुरुवारी आकाशात अंशतः ढगाळ वातारण आणि थोडा वारा (ताशी ३० किमी) राहील. बंगालच्या उपसागरात संभाव्य कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ओलसर वार्‍यामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये १२ आणि १३ जून रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बंगाल-बिहार आणि झारखंडमध्ये १४ जूनपासून दिसेल मान्सूनचा परिणाम

स्कायमेटनुसार, ११ जूनपासून उत्तर भारतातील राज्यांमध्ये हवामान बदलेल आणि १३ जूनपर्यंत पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटनुसार, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये १४ जूनपर्यंत मान्सूनचा परिणाम दिसून येऊ शकतो. अंदाजानुसार, या राज्यातही याच आठवड्यात मान्सूनचे आगमन होऊ शकते.

युपीला देखील उष्णतेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आता उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेपासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानजवळ विकसित पश्चिम विक्षोभमुळे राज्यात ढगांची हालचाल सुरू झाली आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागराकडून आग्नेय वारे आर्द्रतेसह राज्यात प्रवेश करत आहे, त्यामुळे गुरुवारपासून हवामानाची परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. तर छत्तीसगडच्या जगदलपूरमध्ये मान्सून दाखल झाला आहे. येथे वार्‍यासह जोरदार पाऊस सुरू आहे.