कडक सॅल्यूट ! ग्रीन कॉरीडॉर करत अवघ्या 35 मिनिटात रुग्णास मुंबई विमानतळावर पोहचवले

मीरारोड  : पोलीसनामा ऑनलाईन – वाहतुकीच्या ग्रीन कॉरिडॉर व्यवस्थेने शुक्रवारी (दि.2) एका रुग्णाला जीवदान मिळाले आहे. मीरारोड येथील वोक्हार्ड रुग्णालयातील एका गंभीर अवस्थेतील रुग्णाला हैद्राबाद येथे पुढील उपचारासाठी न्यायचे असल्याने पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर मोहिमेअंतर्गत त्या रुग्णास 35 मिनिटात विलेपार्ले येथील पवन हंस विमानतळावर नेऊन सोडले. वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नामुळे आणि नियोजनबध्दतेमुळे एका रुग्णाला जीवदान मिळाल्याने त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

सदर रुग्णाला हैदराबाद येथे पुढील उपचारासाठी पाठवायचे असल्याने त्याचे नातलग व रुग्णालय प्रशासनाने शुक्रवारी सकाळी वाहतूक पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्याशी संपर्क साधून मदती करण्यासाठी आवाहन केले होते पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना देखील याची कल्पना दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली गेली. वाहतूक पोलीसांनी रुग्णवाहिकेला पायलट वाहनांच्या बंदोबस्तात मीरारोड येथून सकाळी 9.17 वाजता प्रवासाला सुरुवात केली. पोलीसांनी ग्रीन कॉरीडॉर मोहीम राबवून 35 मिनीटांत म्हणजेच 10.05 रुग्णाला विनाअडथळा विमानतळावर पवन हंस विमानतळावर पोहचवले. पायलट वाहनाच्या मदतीने रुग्णवाहिका कुठेही वाहतूक कोंडीत अडकणार नाही याची खबदरदारी पोलिसांनी घेतली. रुग्णाला 11.40 वाजता खास विमानाने हैदराबादला बागमपेठ विमानतळावर उतरवण्यात आले.