5 वर्षे सत्ता देऊन बघा, आम्ही तुमच्यासाठी जीवाचं रान करू : PM मोदी

खड़गपुर : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांत होत आहे. त्याचदरम्यान भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. ‘आम्ही 70 वर्षांपासून सुरु असलेला अन्याय दूर करू. आम्ही तुमच्यासाठी जीवाचं रान करू. 5 वर्षे सत्ता देऊन बघा’, असे ते म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा पहिला टप्पा 27 मार्चपासून सुरु होत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी विविध पक्षांकडून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. खड़गपुर येथे झालेल्या जाहीरसभेत पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवरून ममता सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘तुम्ही काँग्रेसची कारस्थाने पाहिली आहेत. डाव्यांनी राज्याला कसे उद्धवस्त केले याचे तुम्हीच साक्षीदार आहात. आता तुम्ही तृणमूल काँग्रेसचे सरकार पाहत आहात. त्यामुळे यावेळी भाजपला पाच वर्षांसाठी संधी द्या. एकदा आशीर्वाद द्या. आम्ही 70 वर्षांपासून सुरु असलेला अन्याय दूर करू. आम्ही तुमच्यासाठी जीवाचं रान करू’.

दरम्यान, काल रात्री फेसबुक, व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्राम यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाऊन झाले होते. सुमारे तासभर हे सर्व बंद होते. मात्र, बंगालमध्ये लोकांची स्वप्न, विकास आणि सरकारमधील विश्वास हे सगळे गेल्या 50 ते 55 वर्षांपासून डाऊन आहे, असेही ते म्हणाले.