धक्कादायक ! अख्खं महाबळेश्वरचं विकायला काढलं, वकिलासह दोघांविरूध्द फसवणूकचा FIR

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाइन – साताऱ्यामधील नामांकित वकील व त्याच्या मित्राने ‘जमीन नावावर करुन देतो’ असे सांगून एकाला २५ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वैभव लक्ष्मण गिरी (वय ५४) यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी ४८७५ एकर व २५ आर जमीन विकण्याचा बहाणा केला. हे संपूर्ण क्षेत्र महाबळेश्वर चे असल्याचे सांगत, जणू काय अख्खे महाबळेश्वरच विकायला काढले होते की काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार अ‍ॅड. रविराज गजानन जोशी (रा. सातारा) व सुहास लक्ष्मण वाकडे (रा. डेक्कन जिमखाना, पुणे) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे साताऱ्याचे वैभव गिरी हे मुलांच्या शिक्षणासाठी पुणे येथे राहत होते. त्यांचे साताऱ्यात येणे असल्याने त्यांची २०१८ साली अ‍ॅड. रविराज जोशी यांच्याशी ओळख झाली. तसेच ते न्यायालयीन कामासाठी महाबळेश्वर ला जात असत.

एकदा महाबळेश्वर येथे वैभव गिरी यांच्याशी अ‍ॅड. जोशी यांची भेट झाली. तेव्हाच ‘महाबळेश्वर, लिंगमळामी प्रतापगड, वेण्णा लेक, ऑर्थरसीट पॉईंट याठिकाणी दिवंगत दत्तो भैरव पिंगळे यांनी देवस्थान जमीन ईमान ३ च्या सनदेने ४८७५ एकर व २५ आर इतकी जमीन मिळाली आहे. त्यांचे वारस सध्या महाबळेश्वर मध्ये राहत असून, ते माझ्या ऐकण्यात आहेत. मी व माझे पुण्यातील मित्र सुहास वाकडे हे पिंगळे यांची जमीन तुमच्या नावाने करुन देऊ शकतो,’ असे आमिष गिरी यांना दाखवण्यात आले.

नंतर पुण्यातील वाकडे यांच्या घरात अ‍ॅड. जोशी यांनी देण्याघेण्याचे व्यवहार ठरवले. गिरी व माधवी ओतारी यांनी जमीन खरेदीसाठी नोव्हेंबर, डिसेंबर २०१९ या महिन्यात पाच लाख रुपये दिले. करण्यात आलेल्या व्यवहाराची नोटरी जानेवारी २०२० मध्ये पुण्यात झाली. त्याचवेळी चार लाख रुपये रोखे व सहा लाख रुपये बँकेतून वर्ग करण्यात आले. आजतागायत एकूण २५ लाख रुपये दिले. मात्र, मिळकतीचा ताबा देण्याची मागणी केल्यावर अ‍ॅड. जोशी व वाकडे यांनी टाळाटाळ केल्याने गिरी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.