पक्षाला आणि कार्यकर्त्यांना काय दिलेत? श्रीपाल सबनीस यांचा सवाल

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष हे आपल्या धीट मांडणी आणि स्पष्टवक्तेपणामुळे सर्व महाराष्ट्रात परिचित आहेत. पिंपरी-चिंचवडमधील साहित्य संमेलन त्यांच्या या स्वभावामुळे त्यांनी गाजवून सोडले होते. त्यांच्या तडाखेबंद भाषणशैलीचे फटकारे आता काँग्रेस नेत्यांना बसले असून त्यांनी नेत्यांच्या घेतलेल्या झाडाझडतीमुळे काँग्रेस कार्यकर्ते सबनीस यांच्यावर जाम खूष आहेत.

गेल्या १५, २० वर्षात काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःचे भले करून घेतले अशी सल पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. ही सल बोलून दाखविण्याचे त्यांचे धाडस होत नव्हते. त्यांच्या मनातील ही नेमकी भावना सबनीस यांनी व्यक्त केली त्यामुळे कार्यकर्ते सबनीस यांच्यावर बेहद्द खूष आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा दोन दिवसांपूर्वी झाला. त्यात श्रीपाल सबनीस यांचे भाषण झाले त्याचे पडसाद पक्षवर्तुळात अजूनही उमटत आहेत. सबनीस या मेळाव्यात बोलताना म्हणाले, पक्षाकडे आता केडर नाही आणि स्वतःची केडर असलेला नेताही नाही. काँग्रेसचे नेते म्हणवणाऱ्यांनी पक्षाला आणि कार्यकर्त्यांना काय दिले? याचा विचार करायची वेळ आता आली आहे. आणखीही काही फटकारे त्यांनी नेतेमंडळींना उद्देशून मारले त्यामुळे नेत्यांची पंचाईत झाली. पण, त्यांना तसे जाहीर दर्शवता येईना अशी स्थिती झाली आहे. एका बुजुर्ग कार्यकर्त्यांने प्रतिक्रिया दिली की सबनीस यांच्यासारखे परखड बोलून नेत्यांना शाब्दिक फटकारे देणाऱ्या वक्त्यांची पक्षाला गरज आहे. पुणे आणि इतरत्र असणाऱ्या प्रस्थापित नेत्यांनी स्वतःचे किती भले करुन घेतले हे कार्यकर्त्यांना चांगले माहित आहे. युवक काँग्रेस, सेवादल अशा संस्थांना नेत्यांनी बळ दिलेच नाही. मग, केडर कशी निर्माण होणार? भाजपकडे संघस्वयंसेवकांची नीष्ठावान फळी आहे. काँग्रेसकडे याची वानवा आहे याकडे सबनीसांनी लक्ष वेधले. बरे झाले सबनीस यांनी चार शब्द ऐकवले अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.