राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना प्रश्न विचारणार्‍या खासदारांचा अभ्यास काय ?

पोलीसनामा ऑनलाईनः मराठा आरक्षण शरद पवारामुळे मिळाले नाही, असे म्हणणा-या खासदारांचा अभ्यास काय? असा प्रश्न विचारुन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ ( NCP leader Chhagan Bhujbal) यांनी उदयनराजेंचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. मराठा आरक्षण देण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा नसतो. घटनेनुसार ते मिळत असते, मात्र पवारांवर आरोप करणाऱ्या खासदाराचा त्यावर अभ्यास नसल्याने ते पवारांवर टीका करत असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

9 डिसेंबरला मराठा आरक्षणाला सप्टेंबर महिन्यात मिळालेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. त्यानंतर भाजपाने ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा टीका करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत भुजबळ यांना विचारे असता भाजपा मराठा आरक्षण प्रश्नी पडद्याआडून राजकारण करत असल्याचे ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी हे विधान केले आहे.

दरम्यान मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. 25 जानेवारीपासून या प्रश्नी सुनावणी सुरु होईल. मराठा आरक्षण प्रश्नावरुन आता भाजपाकडून टीका होऊ लागली आहे. ज्या पक्षाच्या खासदारांनी शरद पवारांवर मराठा आरक्षण प्रकरणी टीका केली त्यातून भाजपाचा हेतू काय ते उघड होत असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे.