शिवसेनेची कोंडी ? संजय राऊतांच्या ट्विटचा अर्थ नेमका काय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी करून सत्ता स्थापन केली. शिवसेना आणि भाजपाचा सत्तासंघर्ष झाल्याने याचा फायदा सरळ सरळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला. सध्या राज्य सरकारला १०० दिवस पूर्ण होत आहेत. दरम्यान हे सरकार ५ वर्ष नाहीतर त्यापेक्षा अधिक काळ टिकेल असा दावा तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. मात्र सध्या विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीत कुरघोड्या समोर येत आहेत.

अलीकडेच्या काळात एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादीने एल्गार परिषदेचा तपास केंद्राकडे देऊ नये अशी भूमिका घेतली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी एनआयएकडे हा तपास देण्याची परवानगी दिली. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी नंतर स्पष्ट केले की एल्गार परिषदेचा तपास आम्ही दिला नाही तर तो केंद्राकडून काढून घेण्यात आला होता असे सांगितले.

दरम्यान राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्याची महत्वाची भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी निभावली होती. सत्तासंघर्षाच्या काळात राऊतांची रोज पत्रकार परिषद होत होती आणि रोज नवीन खुलासे होत होते, विविध ट्विट केली जात होती, एकंदरीतच राऊत हेच माध्यमांमध्ये झळकत होते. त्या दरम्यान संजय राऊतांनी अनेक शेरोशायरीच्या माध्यमातून अनेक संकेत द्यायचे दिले भाजपाला टोमणे मारले. आज पुन्हा संजय राऊतांनी ट्विट केले असून या ट्विटचा अर्थ नेमका काय असेल? याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

संजय राऊतांनी ट्विट केले आहे की, ‘कुछ रिश्ते दरवाज़े खोल जाते है, या तो दिल के, या तो आँखों के’ असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमधून महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी असं समीकरण बनलं असून नवीन नातं जुळले आहे. मग या नवीन जुळलेल्या नात्याने शिवसेनेच्या मनात जागा निर्माण केली की मग त्यांचे डोळे उघडले आहेत असा अर्थ काढला जात आहे. सीएए, एनआरसी अशा मुद्द्यावरुन महाविकास आघाडीमध्ये अनेक मतभेद निर्माण झाले आहेत. तसेच सीएएच्या मुद्द्यावरून काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अनेकदा लक्ष्य केले आहे.

एवढंच नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये विसंवाद दिसून आले. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिकांनी मुस्लीम आरक्षणावरुन सभागृहात मुस्लिमांसाठी कायदा बनवू अथवा अध्यादेश काढू अशी भूमिका मांडली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी यावर सांगितले की अद्याप माझ्याकडे असा काही विषय आलेला नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यात संवाद नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे संजय राऊतांच्या या ट्विटमागे बराच अर्थ दडलाय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या होताना दिसत आहे.