दीपिका, रणबीरसह इतर कलाकारांविरूध्द FIR दाखल करण्याची ‘त्या’ आमदाराची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फिल्म मेकर करण जोहरच्या बॉलिवूड स्टार्ससोबत झालेल्या पार्टीचा मुद्दा भलताच तापला आहे. शिरोमणी अकाली दलचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी करण जोहरच्या पार्टीत उपस्थित असणाऱ्या स्टार्सवर ड्रग्स घेतल्याचा आरोप केला आहे. त्यांनी स्टार्सची माफी मागण्यासही नकार दिला आहे. त्यांनी स्टार्सला डोप टेस्टसाठीही आव्हान दिले आहे. याशिवाय सिरसा यांनी मुंबई पोलिसांकडे या कलाकरांविरोधात FIR दाखल करण्याची मागणी केली आहे.

सिरसा यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “मी मुंबई पोलिसांना विनंती केली आहे त्यांनी व्हिडीओत ड्रग पार्टी दाखवत असलेल्या बॉलिवूड स्टार्सविरोधात द नार्कोटिक ड्रग्स अँड साइकोट्रोपिक सब्सटेंट अॅक्ट 1985 नुसार, एफआयआर दाखल करावी. पार्टीचा व्हिडीओ खुद्द करण जोहरने 28 जुलै 2019 रोजी अपलोड केला होता.” आपल्या ट्विटसोबत सिरसा यांनी मुंबई पोलीस कमिशनर यांना पाठवलेल्या लेटरची कॉपीदेखली शेअर केली आहे.

याआधीही सिरसा यांनी ट्विट करत म्हटले होते की, “जर करण जोहरच्या पार्टीत दिसणारे कलाकार निर्दोष असतील तर डोप टेस्ट करून मला चुकीचे सिद्ध करा.” एका युजरला उत्तर देताना त्यांनी म्हटले होते की, “इशिता यादव या सेलेब्रिटींचा बचाव करत आहे आणि ड्रग्स घेण्याबाबत ते निर्दोष असल्याची वकिली करत आहे. चला तर मग आपण करण जोहर, शाहिद कपूर, वरुण धवन, दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर यांना डोप टेस्ट करण्याची विनंती करूयात. नंतर हा रिपोर्ट ट्विटरवर शेअर करून मला चुकीचे सिद्ध करा.”

सिरसा यांनी सेलेब्रिटींवर जो ड्रग्स घेतल्याचा आरोप केला आहे त्याला काँग्रेसचे नेते मिलिंद देवडा यांनी यापूर्वीच चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सिरसा यांचं म्हणणं आहे की, ते या केसला पुढे घेऊन जाणार आहेत आणि स्टार्सचा ढोंगीपणा उघड करणार आहे. त्यांचं म्हणणं आहे की, त्यांना ट्रोलिंगने काहीही फरक पडत नाही. ते ड्रग्सविरोधात लढत आहेत.

अद्याप पार्टीतील कलाकारांची यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. बी टाऊनमधील इतर सेलेब्रिटींनीही यावर काही भाष्य केलेलं नाही. व्हिडीओत करण जोहर दिसत नाही कारण तो व्हिडीओ बनवत होता. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, शाहिद कपूर, जोया अख्तर, अयान मुखर्जी, विक्की कौशल, रणबीर कपूर, वरूण धवन हे कलाकार दिसत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –