राज्यातील सिनेमा हॉल, हॉटेल्स, मंदिरे कधी सुरू होणार ? खासदार सुळेंनी दिलं ‘हे’ उत्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोनाचा प्रसार स्थिर असला तरी परिस्थिती धोक्याबाहेर आहे असे म्हणता येणार नाही. कोणीही धोका पत्करू नये. यासंदर्भात तज्ज्ञांनी निर्णय घेणे अपेक्षित असून, राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. येणाऱ्या आठ दिवसांत राज्यातील चित्र आणखी सुधारण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुख्यमंत्री व पालकमंत्री ई-पास सह राज्यातील ‘अनलॉक’च्या बाबत निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. ई-पास, चित्रपटगृहे, मंदिरे, जिम आणि हॉटेल्स कधी सुरु होणार यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गुरुवारी सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेत शहरातील कोरोनाच्या स्थितीचा तसेच त्यांच्या मतदार संघातील विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरावरुन बारामतीत सुरु केलेल्या आंदोलनांच्या अनुषंगाने सुप्रिया सुळे यांनी राजू शेट्टी यांना टोला लगावत, लोकशाहीत प्रत्येकास आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आमचे सरकार दडपशाहीचे सरकार नाही. कोणाला आंदोलनाची इच्छा झाली असेल तर त्याचे स्वागत करायला हवे, असे त्यांनी सांगितलं.

परीक्षांबाबत बोलताना सुळे यांनी म्हटलं की, जेईई-नीट वगैरे परीक्षांच्या तारखा आता पुढे ढकलू नये अशी न्यायालयाला विनंती करते. देशभरातील राज्य सरकारांनी आपापली भूमिका न्यायालयात मांडली आहे. म्हणून आता वेळेत निर्णय व्हावा. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावरती फार बोलणे उचित होणार नसून महाराष्ट्र सरकारचे जे मत असेल तेच माझे मत असल्याचं सुळे म्हणाल्या.

सरकारने मशिदी उघडू दिल्या नाही तर आम्ही स्वतः उघडू असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. त्यावर बोलताना सुळे म्हणाल्या, सरकारला वेळ देणे आवश्यक असून मागण्या, सूचना यांचा अभ्यास करुन निर्णय घेतला जातो. लोकशाहीने जलील यांना आंदोलनाचा अधिकार दिला आहे.

दरम्यान, त्यांनी परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांचा राजीनामा तसेच सुशांतसिंह राजपूत सीबीआय चौकशी या प्रकरणावरती बोलणे टाळले.