…म्हणून रेल्वेमंत्र्यांनी रात्री 2 वाजता ट्वीट करुन साधला मुख्यमंत्रयांवर ‘निशाणा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – केंद्र सरकारकडून मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी हव्या तितक्या रेल्वेगाड्या मिळत नसल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवले होते. त्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आक्रमक भूमिका घेत, महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे. मजुरांची यादी अद्याप मिळाली नसून लवकरात लवकर यादी पाठवावी असे म्हणत रात्री सव्वा बारा वाजता ट्वीट केले. त्यानंतर त्यांनी सव्वा दोन वाजता ट्वीट करुन 125 गाड्यांची तयारी केली असताना आम्हाला फक्त 46 ट्रेन्सची यादी मिळाली असून त्यापैकी 41 ट्रेन सोडाव्या लागणार आहेत. कारण उर्वरित पाच ट्रेन पश्चिम बंगाल आणि ओदिशाला जाणार्‍या असून त्या अम्फान चक्रीवादळामुळे चालवू शकत नाही, असेही पियुष गोयल यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकारने अजूनही यादी दिली नसल्याचे ट्वीट रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रात्री सव्वा बारा वाजता केले होते. रात्रीचे 12 वाजले आहेत आणि पाच तासांनंतरही आमच्याकडे महाराष्ट्र सरकारकडून उद्याच्या 125 ट्रेन्सची माहिती आणि प्रवाशांची यादी आलेली नाही. तरीही प्रतीक्षा करा आणि तयारी सुरु ठेवा, असा आदेश मी अधिकार्‍यांना दिला आहे.माझी सूचना आहे की, महाराष्ट्र सरकारने पुढच्या एक तासात किती ट्रेन, कुठेपर्यंत आणि प्रवाशांची यादी आम्हाला पाठवावी.

आम्ही प्रतीक्षा करत आहोत आणि पूर्ण रात्र काम करुन उद्याच्या गाड्यांची तयारी करु. कृपया प्रवाशांची यादी पुढच्या एक तासात पाठवा. यानंतर पुन्हा दोन तासांनी म्हणजेच रात्री सव्वा दोन वाजता रेल्वेमंत्र्यांनी आणखी एक ट्वीट केले.महाराष्ट्रातून सुटणार्‍या 125 गाड्यांसाठी मजुरांची यादी कुठे आहे? दोन वाजेपर्यंत फक्त 46 ट्रेन्सची यादी मिळाली असून त्यापैकी पाच पश्चिम बंगाल आणि ओदिशाला जाणार्‍या आहेत, परंतु अम्फान वादळामुळे त्या चालवल्या जाणार नाहीत. आम्ही 125 गाड्यांची तयारी केली असताना फक्त 41 ट्रेन सोडाव्या लागणार आहेत.