आषाढी एकादशी : विठुरायाच्या पूजेसाठी वारकरी प्रतिनिधीचा मान कोणाला ?

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती यंदाची आषाढी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रतिवर्षी दर्शनाच्या रांगेतील एका वारकरी दाम्पत्याची आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेस वारकरी प्रतिनिधी म्हणून निवड केली जाते. त्या वारकरी पती-पत्नीला मुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्याचा मान दिला जातो. मात्र, यंदा दर्शनाची रांग नसल्यामुळे हा मान कोणाला दिला जाणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

आषाढी एकादशी १ जुलै रोजी संपन्न होणार आहे. त्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत. प्रतिवर्षी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी रांग लागलेली असते. या दर्शनाच्या रांगेत मंदिरात असलेल्या वारकरी दाम्पत्याला वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांसोबत श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळतो. महापूजेच्या नंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वारकरी दाम्पत्याचा सत्कार केला जातो आणि एसटी महामंडळाच्या वतीने वर्षभराचा मोफत प्रवासाचा पास दिला जातो. यंदा वारीसाठी वारकऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे दर्शनाची रांग सुद्धा असणार नाही. म्हणून वारकरी प्रतिनिधी म्हणून यंदा कोणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे. यासंदर्भातील निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती घेणार आहे.

कोरोना संसर्गाचा प्रसार होवू नये म्हणून वारकऱ्यांना पंढरपुरात येण्यास निर्बंध घातले आहे. त्यामुळे वारकरी प्रतिनिधीचा मान पंढरपूर नगरपालिकेच्या सफाई कामगार दाम्पत्यास देण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक कृष्णा वाघमारे यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांना लेखी निवेदन देवून केली आहे. तर दुसरीकडे विठ्ठलाचा भक्त असलेल्या शेतकऱ्याला यंदाच्या आषाढीला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान द्यावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी केली आहे. या संदर्भातले लेखी निवेदन जिल्हाधिकारी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विठ्ठल हे शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे दैवत मानले जाते. वारीला येणारे बहुतांश वारकरी हे शेतकरी असतात. कोरोना संसर्गामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्वरुपात मोठे नुकसान झाले आहे. अशावेळी शेतकऱ्याला आत्मिक दिलासा देण्यासाठी त्याच्या दैवताची पूजा करण्याचा मान शेतकरी भक्ताला देण्यात यावा, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like