भाजपाकडून दूध आंदोलन चालू असताना शरद पवार पोहचले थेट गायींच्या गोठ्यावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने राज्यभर दूध दरवाढ मिळावी यासाठी आंदोलन केलंय. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर कोणत्याही प्रकारची टीका न करता थेट आंबेगाव तालुक्यातील सुलतानपूर इथल्या भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड आणि पराग उद्योग समूहाला भेट दिलीय. तसेच दूध धंद्यातील अडचणी आणि उत्पादकता वाढीसाठी काय करता येईल? याची माहिती घेतली. भाजपच्या आंदोलनावर कोणत्याही प्रकारची टीका शरद पवार यांची भेटीची चर्चा होत आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले.

यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पराग उद्योग समूहाचे अध्यक्ष देवेंद्र शहा, प्रीतम शहा आदी उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, शेतकर्‍याला जर दूध धंद्यात टीकायचे असेल तर गायीचे दूध वाढविण्यावर आणि वाढलेल्या दुधावर प्रक्रिया केल्याशिवाय पर्याय नाही. उत्पादकता वाढली तरच दूध धंद्याला स्थिरता येईल.

बारामतीत शेतकर्‍यांना वरदान ठरणारा सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर डेअरी हा प्रकल्प उभा राहत आहे. त्यात शेतकर्‍यांच्या संकरित आणि होस्टेन जातीच्या दुभत्या गायींची दूध क्षमता वाढविण्यासाठी तसेच दुभत्या जनावरांमधील संशोधन करण्यासाठी याची स्थापना केलीय.

भाजपचा दूध आंदोलनावरून समाचार घेत कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, भाजप मागच्या पाच वर्षांपासून सत्तेत होते. मात्र, दूध उत्पादक शेतकरी आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नाबाबत त्यांनी कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. आणि आज भाजपने दूध दरवाढीविरोधात आंदोलन पुकारले आहे. हे भाजपचे आंदोलन राजकीय आहे.

देशात आणि राज्यात कोरोना महामारीचे संकट आहे. यातही राज्य सरकारने अतिरिक्त दूध खरेदीचा निर्णय घेतलाय. यातून शेतकर्‍यांच्या दुधाचे नुकसान होऊ नये, यासाठी उपाययोजना केल्यात. शेतकर्‍यांना यातून दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. पुढील काळात दुधाचे दर आणि निर्यातीबाबत राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात विचारविनिमय सुरू आहे. यावर योग्य तो निर्णय राज्य सरकार घेईल,वळसे-पाटील यांनी सांगितले आहे.