विद्यमान खासदाराचा पत्ता कापून उमेदवारी दिलेले जयसिद्धेश्वर आहेत तरी कोण ?

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव मठाचे प्रमुख डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कापून भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. एका संताला महाराष्ट्रात राष्ट्रीय पक्षाने उमेदवारी देण्याची ही बहुदा पहिलीच घटना आहे.

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे आयुष्यभर अंगावर भगवी वस्त्रे नेसून त्यांनी धर्म प्रवचन हे कार्य स्वीकारले आहे. त्यांचा आजवर राजकारणाशी संबंध नव्हता. जयसिद्धेश्वर यांनी धर्मशास्त्रात पीएचडी केली असून कन्नड, मराठी, तेलगु, हिंदी यासह अनेक भाषा अवगत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून जयसिद्धेश्वर यांचे नाव जोरात चर्चिले जात होते. शरद बनसोडे यांना बदलले जाणार हे त्याचवेळी निश्चित झाले होते. परंतु, त्यांच्या जागी कोण असणार याविषयी उत्सुकता होती. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या नावावर जोर लावला होता. त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा केल्यावर मुख्यमंत्र्यांनी जयसिद्धेश्वर यांचे नाव निश्चित केल्याचे सांगितले जाते.

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी २०१४ मध्ये भाजप उमेदवाराच्या शोधात होते. जयसिद्धेश्वर यांचे नाव तेव्हाही चर्चेत आले होते. मात्र, या राखीव मतदारसंघात जातीचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांचे नाव मागे पडले होते.