…तर ‘कोरोना’चे रौद्र रुप लवकरच दिसेल, COVID-19 बाबत WHO चं ‘मोठं’ विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा प्रसार संपूर्ण जगभरात झाला असून याचा प्रसार वेगाने होत आहे. जगभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. भारतात देखील कोरोनामुळे संक्रमित होण्याची प्रकरणं झपाट्याने वाढत असली तरी मृत्यूदर कमी आहे. भारतातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 लाखांच्या वर पोहचली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं मोठं विधान केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेतील तज्ज्ञ ट्रेड्रोस यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीचे रौद्ररुप पहायला मिळू शकते. जर नियमांचे पालन केले नाही तर हा व्हायरस लोकांना मोठ्या प्रमाणात संक्रमित करू शकतो. या महामारीला हरवण्यासाठी एकजूटीने आपण सगळ्यांनी नियमांचे पालन करायला पाहिजे.

याव्यतिरिक्त काही तज्ज्ञांनी सांगितले की, सहा महिन्यांपूर्वी ही महामारी रौद्ररुप धारण करेल याबाबत अंदाज नव्हता. कोरोनामुळे लोकांना आपापाल्या घरी बंद ठेवावं लागेल. जग एका वेगळ्या वळणावर असेल अशी कल्पना देखील केली नव्हती. जागतिक आरोग्य संघटनेच्या इमेरजेन्सी प्रोग्रामचे प्रमुख डॉक्टर मायकल रेयान यांनी सांगितले की, या माहामारीतून मार्ग काढण्यासाठी भेदभावाची भावना लोकांमधून नष्ट होणे गरजेचे आहे. सगळ्यांनी मिळून कोरोना महामारी नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

या तीन देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय
टेड्रोस यांनी सांगितले की, काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाला असला तरी जागतिक स्तरावर ही महामारी वाढत आहे. जगभरात आत्तापर्यंत कोरोना व्हायरसच्या 80 ते 1 लाखापर्यंत केसेस समोर येत होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यामध्ये वाढ होत असून रोज दीड लाखापेक्षा जास्त केसेस समोर येऊ लागल्या आहेत. अमेरिका, ब्राझिल आणि भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अमेरिका आणि ब्राझिलमध्ये रोज जवळपास 30 हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.

तीन लक्षणांची भर
दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यातच आता कोरोनाची आणखी तीन लक्षणं आढळून आली आहेत. कोरोनाची बाधा झाल्यास सर्दी, उलट्या, अतिसाराचा त्रास होतो. मात्र यात आणखी तीन लक्षणांची भर पडली आहे. अमेरिकन सेंटर फॉर डिजीज कंट्रोलनं तीन नव्या लक्षणांचा समावेश केला आहे. यात नाक गळणं, पोटात ढवळणं, उलट्या यांचा समावेश आहे. यापूर्वी कोरोनाची 9 लक्षणं आढळून आली होती. यामध्ये कोरडा खोकला, ताप, श्वासोच्छवासात अडचणी, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी, तोंडाची चव जाणं, घशात खवखव यांचा समावेश आहे.